सैफच्या घरात शिरून त्याच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांनी सीन रिक्रिएट केला. आरोपीने कसा प्रवेश केला, त्यानंतर तो कुठे गेला, सैफवर हल्ला कसा केला, या सर्व गोष्टी त्याला सीन रिक्रिएट करताना विचारल्या गेल्या.
अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी Image Credit source: Instagram
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आरोपीला घेऊन मुंबई पोलीस सैफच्या घरी पोहोचले. ज्याठिकाणी त्याने सैफवर हल्ला केला, त्याठिकाणी सीन रिक्रिएट करण्यात आला. आरोपीकडून एकेक माहिती मिळवून जवळपासून एक तास पोलिसांनी हा सीन रिक्रिएट केला. 16 जानेवारी रोजी रात्री दोन वाजता आरोपी सैफच्या घरात शिरला आणि त्याने अभिनेत्यावर चाकूहल्ला केला होता. आरोपीने सैफवर सहा वार केले होते. त्यापैकी दोन वार खोलवर झाले होते. यानंतर सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफची प्रकृती आता ठीक असून त्याला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.
चोरीच्या उद्देशाने आरोपी सैफचा छोटा मुलगा जहांगीरच्या खोलीस शिरला. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. यातील एक महिला कर्मचाऱ्याला त्याने आधी शांत राहण्यास सांगून धमकावलं होतं. तसंच एक कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा या सैफच्या लहान मुलाला उचलण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान आणि करीना कपूर दोघंही तिथे पोहोचले. त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या चाकून सैफवर हल्ला केला. तैमुरची आया गीता यादेखील मधे पडल्याने जमखी झाल्या होत्या.
हे सुद्धा वाचा
आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने भारत-बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. सात महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंततर आरोपीने कोलकातातील व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड खरेदी केल्याचं चौकशीत उघड झालं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ठाण्यातून अटक करण्यात आलेला आरोपी शरिफुल हा बांगलादेशात बारावीपर्यंत शिकला आहे. सात महिन्यांपूर्वी भारतात घुसखोरी करताना त्याने कोणाचीही मदत घेतली नाही. तो स्वत: तिथल्या डावकी नदीतून 200 मीटर पोहून भारतात दाखल झाला. भारतात आल्यावर विजय दास नाव सांगू लागला. कोलकात्यामध्ये तो काही काळ वास्तव्याला होता. त्यावेळी त्याने कोलकात्यातील एका व्यक्तीच्या नावाने मोबाइल सीमकार्ड खरेदी केलं.