साखर शंभर रुपयांनी वधारलीpudhari
Published on
:
21 Jan 2025, 7:30 am
Updated on
:
21 Jan 2025, 7:30 am
केंद्र सरकारने 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय सोमवारी (दि. 20) घोषित केला. त्यामध्ये महाराष्ट्रातील कारखान्यांना सुमारे 3 लाख 74 हजार 996 मेट्रिक टन साखर निर्यातीचा कोटा मंजूर करण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. त्यामुळे घाऊक बाजारातील मनोवृत्ती तेजीकडे झुकली असून, साखरेच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ होऊन दर 3950 ते 4000 रुपयांवर पोहचले.
साखर निर्यातीला परवानगी देण्यासाठी देशभरातील साखर उद्योगाच्या संघटनांनी गत वर्षापासून केंद्र सरकारकडे या विषयाची मागणी लावून धरली होती. मात्र, प्रथम लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर काही महत्त्वाची राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखर दरवाढ होऊन फटका बसू नये, यासाठी निर्यातीचा विषय सातत्याने लांबणीवर पडल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, केंद्रात पुन्हा एकदा भाजप व मित्रपक्ष सत्तारूढ झाल्यानंतर साखर उद्योगातील संघटनांनी ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली. देशात साखरेचा पुरेसा आणि गरजेहून अधिक साखरेचा साठा शिल्लक असल्याने अतिरिक्त साखर देशाबाहेर गेल्यास स्थानिक बाजारात दर वाजवी पातळीवर स्थिरावण्यास मदत होईल, असा सूर साखर उद्योगातून सतत आळवला जात होता. अखेर केंद्राने ही मागणी मान्य करीत दहा लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. येथील घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात एस 30 ग्रेड साखरेच्या निविदा क्विंटलला 3550 रुपये दराने विक्री होत होत्या, तर घाऊक बाजारातील साखरेचे दर क्विंटलला 3850 ते 3900 रुपयांवर स्थिरावले होते. साखर निर्यातीची घोषणा होताच बाजारातील मनोवृत्ती तेजीकडे झुकली आहे. सोमवारी साखरेच्या दरात शंभर रुपयांनी वाढ होऊन हे दर 3950 ते 4000 रुपयांवर पोहचले आहेत. साखरेच्या निविदाही वाढण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतील सूत्रांनी वर्तविला.