Published on
:
21 Jan 2025, 10:32 am
Updated on
:
21 Jan 2025, 10:32 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: देशांतर्गत शेअर बाजाराने आज (दि. २१) मोठी घसरण अनुभवली. मंगळवार, २१ जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १२३५ अंकांनी घसरून ७५८३८ वर तर निफ्टी ३२० अंकांच्या घसरणीसह २३०२४ वर बंद झाला. ७ जून २०२४ नंतर निफ्टीने सर्वाधिक घसरण अनुभवली. गुंतवणूकदारांचे बाजार मूल्य एका झटक्यात सुमारे ५ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. ( Stock Market Closing Bell )
Sensex plunges 1,235.08 points to settle at 75,838.36; Nifty tumbles 320.10 points to 23,024.65
— Press Trust of India (@PTI_News) January 21, 2025Pudhari
सर्वच क्षेत्रात विक्रीचा जोर
बाजारात निफ्टीमध्ये ट्रेंट, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय हे सर्वाधिक तोट्यात होते. सर्वाधिक लाभार्थी कंपन्यांमध्ये अपोलो हॉस्पिटल्स, बीपीसीएल, टाटा कंझ्युमर, जेएसडब्ल्यू स्टील, श्रीराम फायनान्स यांचा समावेश होता. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिअल्टी निर्देशांकांमध्ये ४ टक्क्यांनी घसरण झाल्याने सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. तर बँका, वीज, दूरसंचार, भांडवली वस्तूंमध्ये २ टक्क्यांनी घट झाली.
Pudhari
डोनाल्ड ट्रम्प यांनी साेमवारी ( २० जानेवारी) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी व्यापारी शुल्क वाढवण्याचा दिलेला इशारा हे बाजारातील घसरणीचे कारण मानले जात आहे. ट्रम्प २.० मध्ये आर्थिक निर्णयांबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घेवूया आजच्या शेअर बाजार घसरणीमागील पाच प्रमुख कारणे...
ब्रिक्स देशांवर कर लादण्याची ट्रम्प यांचा इशारा
ब्रिक्स देशांना लक्ष्य करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ब्रिक्स देशांमध्ये भारतासह ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. सोमवारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करणाऱ्या देशांवर १०० टक्के कर लादण्याचा त्यांचा मानस आहे. कोणताही ब्रिक्स देश... डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचाविचार करत असेल, तर त्याला १००% कर आकारले जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारत हा ब्रिक्सचा एक प्रमुख सदस्य आहे. ट्रम्प यांच्या इशाराचा भारतावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेचा भारताच्या व्यापार समीकरणांवर परिणाम होऊ शकतो आणि बाजारात मोठ्या चिंता निर्माण होऊ शकतात. ट्रम्प यांनी फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची योजनाही जाहीर केली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात आणखी व्यत्यय येण्याची शक्यता वाढली आहे. ट्रम्प यांच्या भारताबद्दलच्या त्यांच्या भूमिकेबद्दलच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेण्यास भाग पाडल्याचा शेअर बाजारवर परिणाम दिसला.
डिसेंबर तिमाहीत कंपन्यांच्या मिश्र तिमाही निकालांमुळे बाजारातील चिंतेत भर पडली आहे. आज बाजार उघडताच झोमॅटोचे शेअर्स ९ टक्क्यांनी कोसळले. झोमॅटो त्यांच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटचा आक्रमकपणे विस्तार करत आहे, ज्यामुळे त्यांच्या डिसेंबर तिमाहीच्या नफ्यावर परिणाम झाला. रिअल इस्टेट क्षेत्रातही ओबेरॉय रिअल्टीचे निकाल स्ट्रीटच्या अपेक्षेपेक्षा कमी पडल्यानंतर त्याचे शेअर्स ७.६ टक्क्यांनी घसरले.
जपानमध्ये व्याजदर वाढण्याची अपेक्षा
बँक ऑफ जपान कडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याने आज जागतिक बाजारपेठेत अस्वस्थता निर्माण झाली. ही वाढ झाली तर गेल्या वर्षी जुलैनंतरची ही पहिलीच वाढ असेल. ही वाढ एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर कर्ज घेण्याच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो. यामुळे रोखतेच्या कमतरतेबद्दल आणि भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांवर त्याचा संभाव्य परिणाम याबद्दल चिंता आणखी वाढली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीसत्र सुरुच
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय बाजारातून पैसे काढण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. सोमवार, २० जानेवारी रोजी त्यांनी सुमारे ४,३३६.५४ कोटी रुपयांचे शेअर्स निव्वळ विकले. जानेवारी महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ५०,९१२.६० कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.
अर्थसंकल्पातील घोषणांपूर्वी गुंतवणूकदारांचे 'वाट पाहा' धाेरण
२०२५ अर्थसंकल्पाच्या घोषणांपूर्वी गुंतवणूकदार 'वाट पहा आणि वाट पहा'च्या मनस्थितीमध्ये असल्याचे दिसत आहेत. या महिन्यात ५०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले गेले आहेत. बाजारात दिसणाऱ्या घसरणीचे हे मुख्य कारण आहे."