पवन हिरणवार खून प्रकरणातील फरार आरोपींना बेड्या:बाबुळखेडा येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी शेखू खान व अजहर शेख यांना अटक
11 hours ago
1
नागपूर ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले असून, बाबुळखेडा चिचोली शिवारात घडलेल्या पवन हिरणवार खून प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. खापरखेडा पोलिसांनी शेखू खान आणि अजहर शेख या दोन्ही फरार आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटना २ जानेवारीची असून, पवन धीरज हिरणवार (२८, रा. काचीपुरा, नागपूर) आणि शैलेश उर्फ बंटी हिरणवार (३१) हे त्यांच्या तीन साथीदारांसह एमएच-४७/बीके-०३२३ क्रमांकाच्या कारमधून बाबुळखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना आरोपींनी त्यांची कार अडवली आणि देशी कट्ट्याने गोळीबार केला. या हल्ल्यात पवन हिरणवारच्या डोक्यात दोन आणि छातीत एक अशा तीन गोळ्या लागल्या, ज्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. तर शैलेश उर्फ बंटी हिरणवारला दोन गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला. ही घटना शंकरनगर चौक पेट्रोल पंपाजवळ वर्षभरापूर्वी घडलेल्या खुनाच्या बदल्यात घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक देशी कट्टा आणि चाकू जप्त केला असून, आता दोन्ही मुख्य आरोपींना अटक केल्याने या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)