Published on
:
22 Jan 2025, 1:14 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:14 am
बेळगाव : महात्मा गांधी हे पूर्णपणे धार्मिक होते. सुधारणावादी हिंदू होते. त्यांनी आयुष्यभर देवाची पूजा केली. त्यांना जेव्हा गोळ्या मारण्यात आल्या, त्यावेळीही त्यांच्या मुखातून रामाचेच नाव निघाले. पण, भाजपचे लोक महात्मा गांधी हिंदूविरोधी होते, अशी अफवा पसरवून त्यांची बदनामी करत असतात. त्यांना महात्मा गांधी यांचे हिंदुत्व कधी समजूनच आले नाही, असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले.
सुवर्णसौध आवारात मंगळवारी (दि. 21) राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. तत्पूर्वी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व मान्यवरांनी चरखा चालवून पुतळ्याचे अनावरण केले. ते पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी बेळगावातील अधिवेशनात सत्य, अहिंसा आणि ग्रामविकास या तत्त्वांचा प्रचार केला. महिला सबलीकरण व अस्पृश्यता निवारण यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. कर्नाटकच्या भूमीतून महात्मा गांधींनी देशाला आवाहन केले होते. त्यातूनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले, महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. बेळगावात 1924 साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनात ते एकदाच अध्यक्ष होते. या अधिवेशनात त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला समानता आणि देशातील एकता या विषयावर मार्गदर्शन केले होते. तिथूनच पुढे देशभर काम सुरु झाले. त्यावेळी बेळगावने देश एक केला होता. बेळगावचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान खूप मोठे आहे. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आल्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक याठिकाणी झाली. हे सर्व कार्यक्रम अभूतपूर्व झाले असून लवकरच आम्ही गुलबर्गा येथे महात्मा गांधी यांचा आणखी एक पुतळा उभारणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
विधानसभा अध्यक्ष यू. टी. कादर यांनी प्रास्ताविक केले. कायदामंत्री एच. के. पाटील यांनी स्वागत केले. तर पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आभार मानले. व्यासपीठावर खासदार प्रियांका गांधी, राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, खासदार रणदीपसिंग सुरजेवाला, के. सी. वेणूगोपाल, विधानसभा उपाध्यक्ष रुद्रप्पा लमानी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, काँग्रेसचे मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बहिष्काराचा इशारा देताच मिळाली जागा
सुवर्णसौधसमोर आयोजित पुतळा अनावरण कार्यक्रमात वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना सर्वात शेवटी जागा ठेवली होती. तेथून कार्यक्रम व्यवस्थित पाहता येत नव्हता. आसन व्यवस्थाही व्यवस्थित नव्हती. खुर्च्यांवर धूळ होती. पत्रकारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमावर बहिष्काराचा इशारा दिला. त्यामुळे, विधान परिषद सदस्य नागराज यादव यांच्या पुढाकाराने काँग्रेस नेते पवन खेडा आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी मध्यस्थी करुन पत्रकारांसाठी दुसरीकडे आसन व्यवस्था केली.?
लोगो अनावरण, पुस्तक प्रकाशन
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गदग येथील महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठाच्या लोगोच्या अनावरण करण्यात आले. तसेच महात्मा गांधी यांचे भाषण आणि विविध लेख असलेले पुस्तक प्रकाशित करण्यात आले. टपालाच्या विशेष लखोट्याचेही प्रकाशन करण्यात आले.