Published on
:
22 Jan 2025, 4:57 am
Updated on
:
22 Jan 2025, 4:57 am
डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील देवीचापाड्याला लागून असलेल्या रेल्वे मार्गालगत एक तरूण बेवारस स्थितीत मरून पडला होता. देवीचापाड्याचे पोलिस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी ही माहिती समाज माध्यमांवर प्रसारित केली. या माहितीवरून पोलिस पाटील भोईर यांना मृताची ओळख पटवून देण्यास एका रहिवाशाने साह्य केले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पोलिस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी ही माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना दिली. एकीकडे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलला पाठवून दिला. तर दुसरीकडे या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी मयत हा अंमली पदार्थ व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो आमच्या संपर्कात नव्हता, असे लोहमार्ग पोलिसांना सांगितले.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. नाशेखोरांना उठा-बशा काढायला लावण्यापासून आता तर त्यांनी मुळावरच घाव घालायला सुरूवात केली आहे. अंमली पदार्थांचे स्त्रोत रोखण्यासाठी या गोरखधंद्यांत असलेल्यांची पाळेमुळे खणायला सुरूवात केली आहे. एकीकडे अंमली पदार्थ विरोधी कारवायांचा धडाका सुरू असतानाच डोंबिवलीत नशेच्या आहारी गेलेल्या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
अंमली पदार्थ तस्करांचे खुले आव्हान
देवीचापाडा, कुंभारखाणपाडा आणि गणेशनगर खाडी किनारपट्टीत काही ठराविक बदमाश चरस, एमडी पावडर, गांजाची लपूनछपून तस्करी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हे बदमाश लपूनछपून विक्रीचे व्यवहार करत असल्याने पोलिसांच्या तावडीत सापडत नसल्याचे समजते. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकामार्फत कारवाई करावी. शिवाय विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळे, खाडी किनारपट्टी, गवताळ आणि झाडा-झुडपांच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी पोलिस तैनात करावेत, अशी मागणी पश्चिम डोंबिवलीकरांकडून करण्यात येत आहे.