डोंबिवलीतील विकास प्रकल्पांच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी मुंबईत मॅरेथॉन बैठक
Published on
:
22 Jan 2025, 7:56 am
Updated on
:
22 Jan 2025, 7:56 am
डोंबिवली : शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या प्रकल्पांचे काम कूर्मगतीने चालू असल्याने भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची बैठक बोलावली होती. शहरातील पाणी टंचाई, फेरीवाल्यांचे स्तोम, अमृत योजना, जलकुंभ उभारणी, स्व. शिवाजी शेलार मैदान, वेदपाठ शाळा, ठाकुर्लीतील प्रकल्पबधित रहिवाश्यांना पर्यायी घरांचे पत्र आणि खुंटलेली विकासकामे, आदी विविध विषयांवर आमदार चव्हाण यांनी प्रश्नांचा भडिमार केला. रखडलेल्या विकास कामांना गती द्या, अशा सूचना आमदार चव्हाण यांनी आयुक्तांना दिल्या. यावर आयुक्त डॉ. जाखड यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना रखडलेली विकास कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
पश्चिम डोंबिवलीतील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड (एमएमबी) अंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामे व भारत सरकारकडून भविष्यात प्राप्त होणाऱ्या निधी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी निर्देशित करण्यात यावे.
गणेशनगरमधील खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे.
जुनी डोंबिवलीतील खाडी किनारी असलेला गणेश विसर्जन घाट विकसित करणे.
कोपरगांव खाडी किनारी असलेला गणेश विसर्जन घाट विकसित करणे.
देवीचा पाड्यातील खाडी किनारी असलेला गणेश विसर्जन घाट विकसित करणे.
यावेळी झालेल्या चर्चेत पश्चिमेतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलकुंभ उभारणे आवश्यक आहे. या कामाकरिता शासनाकडून निधी उपलब्ध आहे. परंतु पाईपलाईन शिप्टींगचे काम पूर्ण होण्यास अडीच महिने लागतील. त्या भागात पाणी वितरण व्यवस्थेचे संम्प पंपच्या भूखंडावरील असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात येणार आहे. पूर्व आणि पश्चिमेत अमृत योजनेतून शासनाकडून 165 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सिव्हरेज टँक बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. पूर्वेकडील पाथर्ली झोपडपट्टीत असलेल्या बीएसयूपी प्रकल्पामधल्या गाळ्यांमध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी आमदार निधी देणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. स. वा. जोशी विद्यालय ते पश्चमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा विस्तार म्हासोबा चौकापर्यंत करण्यासाठी भूसंपदानादरम्यान होणाऱ्या विस्थापितांना पर्यांयी घरे देण्यासाठी वाटप पत्र देण्यात यावे. भगवान काटे नगरच्या रहिवाश्यांना रेल्वेकडून निष्कासन प्रश्नावर त्यांच्या पुनर्वसनाचा कृतीआराखडा तयार करून त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्यात येईल. तर खंबाळपाड्यातील स्व. शिवाजी शेलार मैदानाच्या विकासासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार रविंद्र चव्हाण यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार. शिवमंदिर रोडला असलेल्या सुसज्ज असलेली वैकुंठ स्मशानभूमीच्या बांधकामासाठी 6 कोटी निधी मंजूर आहे. पश्चिम डोंबिवलीतील सम्राट चौक ते रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन ते रामनगर परिसरातून अवैध फेरीवाल्यांचे उच्चाटन करण्यात यावे. शहराला जोडणाऱ्या रिंगरूट रोडचे काम पूर्ण करणे. महापालिकेच्या टिळकनगरमध्ये असलेल्या आरक्षित भूखंडावर अध्यात्मिक प्रशिक्षणाकरिाता वेद पाठशाळा उभारणीसाठी 10 कोटींचा विकास आराखडा शासनाकडे मंजूरीसाठी पाठवणे. पूर्व-पश्चिमेतील झोपडपट्ट्यांमध्ये दलित वस्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर गलिच्छ वस्ती सुधार योजनेतून तो आराखडा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शहरातील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 15 कोटीच्या निधीमधून विकास करणे. गणेश नगर आणि जुनी डोंबिवली खाडी किनारी गणेश विसर्जन घाट हे आराखडे करून शासनाकडे पाठवणे, आदी विषयांवर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली.