Published on
:
22 Jan 2025, 7:43 am
Updated on
:
22 Jan 2025, 7:43 am
जळगाव | जळगाव शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कालिंका माता चौकात काही दिवसांपूर्वी डंपर खाली येऊन बालकाचा मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त नागरिकांनी डंपर जाळले होते. यामुळे या परिसरात असलेल्या अतिक्रमण रस्त्यावर गाड्या लावून व्यवसाय करणाऱ्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. मात्र काही दिवसांचा काळ गेला असता जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही रस्त्यावरच फलक लागलेले दिसून येत आहे.
जळगाव शहरात प्रवेश करताना कालिंका माता मंदिर चौक हा महत्त्वाचा रस्ता आहे. या ठिकाणी झालेल्या त्रिफुल्लीमुळे वाहतुकीला अनेक अडचणी निर्माण होत असतात त्यात महामार्ग वर पडलेल्या दुभाजकामुळे जुन्या जळगाव मध्ये जाणाऱ्या रस्त्यात अडचणी येतात असे असताना या ठिकाणी अतिक्रमण करून रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे व सायंकाळी तर ही मोठ्या प्रमाणात होते या ठिकाणी खेडी कडे जाणाऱ्या रिंग रोडवर तर चौपाटीच लागलेली असते.
याच कालिंका माता चौकामध्ये 25 डिसेंबरला मामासोबत जाणाऱ्या नऊ वर्षाच्या भाच्याचा डंपर खाली येऊन मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी अवैध वाळू वाहतुकीवर आपला रोष व्यक्त करीत. डंपरला जाळून टाकले होते. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला जाग येत कालिंका माता चौक हा मनपा हद्दीत येत असल्याने त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली होती. जवळपास महिन्याभराच्या अवधीनंतर पुन्हा आता त्या ठिकाणी दुकाने थाटू लागलेली आहे. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण विभागाला हा भाग मनपा हद्दीत येतो याचा विसर पडलेला दिसून येत आहे.
याच ठिकाणी एका राजकीय पुढाऱ्याने वाढदिवसाचा बॅनर लावला आहे. महामार्गाच्या लागून असलेल्या रस्त्यांवर अशाप्रकारे बॅनर लावण्याची महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर हीच परिस्थिती अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आम्ही कारवाई केल्यासारखे करतो तुम्ही रडल्यासारखे करा असे प्रकार सध्या जळगाव सुरू आहे यावर ठोस कारवाई कुठेच होताना दिसून येत नाही. मनपाचे संजय ठाकूर यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा पदभार आहे. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता तो झाला नाही.