Naga Sadhu Female : सध्या प्रयागराजमध्ये महामेळा भरला आहे. हा महामेळा साधू संतांचा आहे. तब्बल 12 वर्षानंतर हा महामेळा भरला आहे. महाकुंभची आपण चर्चा करत आहोत. महाकुंभसाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक आले आहेत. लाखो लोक संगम तटावर एकत्रित झाले आहेत. पाण्यात डुबकी मारून देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर करून घेत आहेत. नागा साधूंनीही शाही स्नानाचा लाभ घेतला आहे. प्रयागराजमध्ये जिथे पाहावे तिथे नागा साधू दिसत आहे. पुरुषच नाही तर महिला नागा साधूही दिसत आहेत. या नागा साधूंबद्दल लोकांना सुप्त आकर्षण आहे. त्यांचं आयुष्याबाबत नागरिकांना जाणून घ्यायचं आहे. नागा साधू कसे होतात? काय करावं लागतं? असे प्रश्न त्यांच्या मनात येतात. महिला नागा साधू कशा बनतात? त्यातही नेपाळी महिला सर्वाधिक नागा साधू का बनतात? असा सवालही लोकांच्या मनात येत आहे. आज त्यावरच आपण प्रकाश टाकणार आहोत.
महिला नागा साधू होण्यासाठी अटी
महिला नागा साधू बनण्यासाठी नेहमी ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं. ब्रह्मचार्याची परीक्षा 6 ते 12 वर्षापर्यंत असते.
या 6 ते 12 वर्षाच्या दरम्यान ती महिला नागा साधू बनण्यास योग्य आहे की नाही हे आखाडा समिती ठरवते.
महिला नागा साधूंना पाच गुरुंकडून दीक्षा घ्यावी लागते. त्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात.
नागा साधू कोणत्याही ऋतूत कपडे घालत नाहीत. पण महिला नागा साधूंना नग्न राहण्याची परवानगी नाही
महिला नागा साधूंना नेहमी काषाय रंगाचे वस्त्र परिधान करावे लागतात. त्याला गती म्हणतात. त्यांना कपाळाला टिळा लावावा लागतो.
महिला नागा साधू होण्यासाठी टकलं होणं आवश्यक आहे. जिवंतपणीच त्यांना स्वत:चं पिंडदान करावं लागतं.
महिला नागा साधू बनण्यासाठी शंकराची घोर तपश्चर्या करावी लागते. अग्नीजवळ बसून ही तपश्चर्या करावी लागते.
महिला नागा साधूंना संसारिक जीवन आणि बंधनांचा त्याग करावा लागतो. त्या साधू बनू शकतात की नाही हे आखाडा समिती ठरवते.
महिला नागा साधूंना रोज कठिण साधना करावी लागते. त्यांना पहाटे उठून नदीत अंघोळ करावी लागते. मग थंडीही का असेना. पण त्यांना हे व्रत करावं लागतं.
रोज ही कामे करावी लागतात
महिला नागा साधूंसाठी तपश्चर्या अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना आगी समोर बसून शिवाची आराधना करावी लागते. महिला नागा साधूंना जंगलात किंवा आखाड्यात राहावं लागतं. महिला नागा साधूंना आखाडा समितीला त्यांच्या आधीच्या जीवनाची माहिती द्यावी लागते. महिला नागा साधूंनाही आपल्या शरीराला भस्म लावावे लागते. दशनाम सन्यासिनी आखाडा महिला नागा साधूंचा बालेकिल्ला मानला जातो. या आखाड्यात सर्वाधिक महिला नागा साधू असतात.
नेपाळी नागा साधू
जुन्या संन्यासिनी आखाड्यात सर्वाधिक नेपाळमधून आलेल्या महिला नागा साधू आहेत. तीन चतुर्थांश नेपाळी महिला नागा साधू या आखाड्यात आहेत. नेपाळमधील वरच्या जातीतील विधवांना पुन्हा लग्न करण्याची परवानगी नाही. नवरा मेल्यानंतर त्यांना विधवाच राहावं लागतं. ज्या महिला नवऱ्याच्या मृत्यूनंतर लग्न करतात, त्यांना समाज स्वीकारत नाही. अशा वेळी या महिला घरी येण्याऐवजी थेट भारतात येतात आणि नागा साधू बनतात.