अभिनेता सैफ अली खानच्या उपचारासाठी मिळणाऱ्या हेल्थ इन्शुरन्स क्लेमवरून सध्या वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील एका डॉक्टरने क्लेमच्या रकमेवरून वीमा कंपनीवर प्रश्न उपस्थित केला आहे
अभिनेता सैफ अली खानवर घरात शिरलेल्या चोराकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्लयात जखमी झालेल्या सैफला मंगळवारी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलं. या उपचारादरम्यान, सैफवर दोन गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्यात सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. मात्र आता सैफच्या रुग्णालयाच्या बिलावरून नवा वाद सुरू झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. सैफला 35 लाख रुपयांचा मेडिक्लेम मंजूर झाल्यावरून मुंबईतील एका डॉक्टरांकडूनच वीमा कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. विमा कंपन्या छोट्या रूग्णालयात पाच लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ करतात मात्र सैफसाठी ३५ लाखांची रक्कम विमा कंपनी देते, असे म्हणत हृदयरोग तज्ज्ञ प्रशांत मिश्रा यांनी काही सवाल उपस्थित केलेत. यासंदर्भात डॉक्टर प्रशांत मिश्रा म्हणाले, विमा कंपन्या छोट्या हॉस्पिटल्सना काढून टाकत आहेत. मला खात्री आहे की, काही वर्षांनी फक्त मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल टिकून राहतील. उपचाराचा खर्च खूप जास्त असेल. मेडिक्लेम प्रीमियम देखील जास्त असणार आहे. सर्वसामान्य माणसाला विमा कंपन्यांच्या जास्त खर्चामुळे त्रास सहन करावा लागतोय, त्यांचा प्रीमियम वाढतोय. त्यामुळे सर्व विमा कंपन्यांसाठी एकसमान पद्धती का नकोत? असा सवालही त्यांनी केलाय.
Published on: Jan 22, 2025 04:35 PM