दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. (Image source- AAP)
Published on
:
22 Jan 2025, 7:46 am
Updated on
:
22 Jan 2025, 7:46 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. "देशाचा पुढील अर्थसंकल्प मध्यमवर्गासाठी समर्पित असावा अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आज मी केंद्र सरकारकडे ७ मागण्या करत आहे.'' असे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
केजरीवाल यांनी इतर राजकीय पक्षांवर मध्यमवर्गीयांचा 'सरकारसाठी केवळ एटीएम' म्हणून वापर केल्याचा आरोप केला. त्यांनी 'आप'च्या जाहीरनाम्यात, मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडे सात मागण्या केल्या आहेत.
अरविंद केजरीवालांच्या केंद्राकडे ७ मागण्या
शिक्षणाचे बजेट २ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवावे. खासगी शाळांमधील फीवर मर्यादा घालायला हवी. उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि शिष्यवृत्ती द्यावी. आरोग्य बजेट १० टक्क्यांपर्यंत वाढवावे. आरोग्य विम्यावरील कर हटवला पाहिजे. चौथा, आयकर सवलत मर्यादा ७ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढवायला हवी. जीवनावश्यक वस्तूंवरून जीएसटी काढून टाकावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रभावी निवृत्ती योजना आणि पेन्शन योजना हवी. ज्येष्ठ नागरिकांसाठी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा असायला हवी. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत मिळावी." अशा सात मागण्या केजरीवाल यांनी केंद्र सरकारपुढे ठेवल्या आहेत.
मध्यमवर्गीय कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नाहीत- केजरीवाल
“देशातील मध्यमवर्ग करांच्या ओझ्याखाली दबला आहे. ते कर दहशतवादाचे बळी आहेत. ते मोठ्या प्रमाणात कर भरतात. पण त्याबदल्यात त्यांना पुरसा मोबदला मिळत नाही. समाजातील मध्यमवर्गीय कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नाहीत,” असे केजरीवाल म्हणाले.