Published on
:
22 Jan 2025, 1:20 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:20 am
चिपळूण : शहरातील व मुंबई-गोवा महामार्गालगत शिवाजीनगर एसटी स्थानकावर लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागात जाणार्या एस.टी. गाड्या थांबवाव्यात, तसेच उपहारगृह व वाहतूक नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केली आहे.
शहरात 1998 पासून एस.टी. प्रशासनाने शिवाजीनगर स्थानक सुरु केले. त्यानंतर अनेक वर्षे सदर स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे चालक-वाहक बदलले जात होते. अनेक वर्षे उपहारगृह देखील सुरु होते. कोकण रेल्वे सुरु झाल्यावर कालांतराने लांब पल्ल्याच्या एस.टी. बसेसची संख्या कमी झाली. परिणामी एस.टी. प्रशासनाचे शिवाजीनगर स्थानकांवरील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.
शिवाजीनगर बसस्थानकावर अनेकवेळा लांब पल्ल्याच्या एस.टी. बसेस प्रवासी चढ-उतार न करता बाहेरुन परस्पर निघून जातात. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाजीनगर बसस्थानकावर अनेक वर्षे उपाहारगृह सुरु होते. कालांतराने उपहारगृहाचे भाडे जास्त व प्रवासी कमी झाल्याने काही वर्षापूर्वी उपहारगृह बंद पडल्याने प्रवासी व एस.टी. विश्रांतीगृहातील चालक-वाहक यांची गैरसोय होत आहे.
शिवाजीनगर बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रण कक्ष फक्त दिवसा सुरु असून, रात्रीच्या वेळी वाहतूक नियंत्रण कक्ष बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवासी वर्गाला एस.टी. बसेसची माहिती मिळत नाही. त्यामुळे सदर वाहतूक नियंत्रण कक्ष 24 तास सुरु करावा. एस.टी. प्रशासनाने सर्व एस.टी. बसेसना प्रवासी चढ उतार करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत. शिवाजीनगर बसस्थानक मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे असून या ठिकाणी अनेक प्रवासी एसटी बसच्या प्रतिक्षेत असतात. मात्र, काही गाड्या महामार्गावरूनच निघून जात असल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते. शिमगोत्सव, गणेशोत्सव, मे महिन्यात या बसस्थानकावर मोठा ताण असतो. त्यामुळे आगाराने येथे चोवीस तास सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी भागवत यांनी केली आहे.