Published on
:
22 Jan 2025, 4:17 am
नाशिक : पतंग उडवताना चाैथ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या आठवर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. नक्ष संदीप बनकर (८, रा. गणेशनगर, काठेगल्ली) असे मृत मुलाचे नाव आहे. सोमवारी (दि.२०) रात्री त्याचा मृत्यू झाला असून, भद्रकाली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
गणेशनगर येथील एका इमारतीवरून सोमवारी (दि. २०) सायंकाळी नक्ष बनकर हा पतंग उडवत होता. पतंग उडवताना तोल गेल्याने नक्ष सायंकाळी सातच्या सुमारास खाली पडला. उंचावरून पडल्याने नक्ष गंभीर जखमी झाला. त्यास सुरुवातीस खासगी व तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी नक्षचा मृत्यू झाला होता. एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबाने आक्रोश केला. नक्ष हा रवींद्र विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. मंगळवारी (दि. २१) शाळेतही शोक व्यक्त करण्यात आला. नक्षच्या मृत्यूप्रकरणी भद्रकाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.