अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनPudhari
Published on
:
22 Jan 2025, 6:20 am
Updated on
:
22 Jan 2025, 6:20 am
अखिल भारतीय नाट्य परिषदेने 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनानिमित्त शुक्रवारी (दि. 24) सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बालमहोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती विभागीय संमेलन प्रमुख क्षितीज झावरे व नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रसाद बेडेकर यांनी दिली.
नाट्यसंमेलनाच्या यजमानपदामुळे नगरच्या रंगकर्मी, तसेच नाट्य रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. येत्या दि. 26 व 27 रोजी संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत होणार्या नाट्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. बाल महोत्सव सावेडी रोडवरील माऊली सभागृहात होणार आहे.
तब्बल 22 वर्षांनंतर शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होत आहे. प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार सिने नाट्यसृष्टीला देणार्या नगर शहरात या संमेलनामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर व निमंत्रक आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य परिषदेची टिम संमेलनाची जय्यत तयारी करीत आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वा. कोकमठाण येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलनिर्मित ‘डस्टर’ ही एकांकिका सादर होईल. सकाळी 11 ते 12 यावेळेत किलबिल बालविकास संस्था निर्मित ‘हीच खरी सुरुवात’ ही एकांकिका सादर होईल.
दुपारी 12 ते 1 दरम्यान होप फाउंडेशननिर्मित ‘जीना इसी का नाम है!’ ही एकांकिका रसिकांना पाहता येणार आहे. दुपारी 2 वाजता नगरमधील रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशननिर्मित ‘कृष्णलीला’ हा कार्यक्रम होणार आहे. स्थानिक कलाकारांची निर्मिती असलेला हा कार्यक्रम भगवान श्रीकृष्णांचे जीवन चरित्र उलगडून दाखवणारा आहे. सर्व एकांकिका, तसेच कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
नगरकरांनी या कार्यक्रमांचा लाभ घेत रंगकर्मींना प्रोत्साहित करावे, असे आवाहन नाट्य परिषद उपनगर शाखेच्या प्रमुख कार्यवाहक चैत्राली जावळे, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, मध्यवर्तीचे नियामक मंडळ सदस्य संजय दळवी, शाखेचे जिल्हाध्यक्ष अमोल खोले, कोषाध्यक्ष जालिंदर शिंदे व मार्गदर्शक पी. डी. कुलकर्णी यांनी केले आहे.