प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 18’ची माजी स्पर्धक यामिनी मल्होत्राला मुंबईत भाड्याने घर मिळवण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामिनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबद्दलची पोस्ट लिहिली आहे. अभिनयक्षेत्रात काम करत असल्याचं सांगताच घरमालक थेट नकार देत असल्याची तक्रार तिने केली आहे. इतकंच नव्हे तर ‘तू हिंदू आहेस की मुस्लीम’ असेही प्रश्न विचारले जात असल्याचं तिने म्हटलंय. मुंबईत राहण्यासाठी भाड्याने घर मिळवणं अत्यंत कठीण असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.
यामिनीची पोस्ट-
‘नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मला आलेला अत्यंत वाईट अनुभव तुम्हाला सांगत आहे. मला मुंबई कितीही प्रिय असली तरी इथे राहण्यासाठी घर मिळवणं अत्यंत कठीण झालं आहे. मी हिंदू आहे की मुस्लीम, गुजराती आहे की मारवाडी असे प्रश्न मला विचारले जात आहेत. इतकंच काय तर मी अभिनेत्री असल्याचं सांगताच ते थेट मला नकार देत आहेत. अभिनयक्षेत्रात काम करते म्हणून मला भाड्याने घर मिळवण्याचा अधिकार नाही का? 2025 मध्येही असे प्रश्न विचारले जातात, याचा मला धक्का बसतोय. जर स्वप्नांसोबत अटी येत असतील तर याला आपण खरंच स्वप्नांचं शहर म्हणू शकतो का’, असा सवाल तिने केला आहे. यामिनीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यात आपलेही अनुभव सांगितले आहेत. मुंबईत भाड्याने घर मिळवणंही सोपं नाही, असं अनेकांनी म्हटलंय.
हे सुद्धा वाचा
यामिनीच्या आधी इतरही काही कलाकारांना अशाच समस्येचा सामना करावा लागला. मुंबईसारख्या शहरात भाड्याने घर देताना अनेक प्रश्नांचा भडीमार केला जातो, जात विचारली जाते, शाकाहार आहात की मांसाहार असेही प्रश्न विचारले जात असल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली.
यामिनी ही अभिनेत्रीसोबतच दिल्ली स्थित डेंटिस्टसुद्धा आहे. तिने ‘मैं तेरी तू मेरा’, ‘गुम है किसी के प्यार में’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. याशिवाय तिने ‘चुट्टलअब्बाई’ या तेलुगू चित्रपटातही भूमिका साकारली आहे. यामिनीने ‘बिग बॉस 18’मध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती. मात्र काही आठवड्यातच ती घराबाहेर पडली.