कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालगतच्या नेरुर-वाघचौडी व गोंधयाळे वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. या दोन्ही वाडीची लोकसंख्या सुमारे दीड हजार एवढी आहे. स्मशानभूमी मागणीसाठी गेल्या काही वर्षांत 20 हून जास्त उपोषणे ग्रामस्थांनी केली. मात्र एमआयडीसी प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतलेली नाही.आता ग्रामस्थांनी पुन्हा येत्या 26 जानेवारीला आर या पारची लढाई लढायचे ठरविले आहे. स्मशानभूमी आणि जोडरस्ता व्हावा यासाठी आमरण उपोषण आणि तरीही काही झाले नाही तर थेट मागितलेल्या भूखंडावरच आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थ श्याम गावडे, मंगेश राऊत यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी दिला आहे.
स्मशानभूमीसाठी संघर्ष ही शोकांतिकाच !
प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळ नेरूर गावातील गोंधयाळे आणि वाघचौडी वाडीतील एमआयडीसी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागत आहेतच, पण मरणानंतर सुद्धा त्यांच्या नशिबात स्मशानभूमी नाही हे विदारक सत्य आहे. गेली 20 ते 25 वर्ष येथील ग्रामस्थ एमआयडीसी आणि शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहेत. गेली दहा वर्षे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी उपोषणे करत आहेत. पण आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळत नाही. ज्या एमआयडीसीसाठी केवळ 35 रुपये दराने आपली जमीन या ग्रामस्थांनी दिली त्या ग्रामस्थांना अजूनही स्मशानभूमीसाठी संघर्ष करावा लागत आहे ही शोकांतिका आहे.
पारंपरिक स्मशानभूमीकडे जाणारी वाट खडतर
या दोन वाडीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची जी पारंपारिक स्मशानभूमी आहे ती अगदी सखल भागात आहे. त्याठिकाणी झाडी वाढलेली आहे. एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेह न्यायचा कसा? विधी करायचे कसे? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांसमोर आहेत. पारंपरिक स्मशानभूमीकडे जाणारी वाटच खडतर असल्यामुळे वाडीत कोणी मयत झाल्यास ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची जी पारंपरिक स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातला भूखंड ओएस-24 मधून बॉर्डरने रस्ता सोडला आहे. परंतु स्मशानभूमीची पारंपरिक जागा आहे ती खोल सखल भागात झाडीझुडपात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी पारंपरिक स्मशानभूमीच्या वरच्या बाजूस औद्योगिक क्षेत्रातला मोकळा भूखंड ओएस-24 मधील तीन गुंठे जागा मिळावी अशी विनंती वारंवार एमआयडीसी प्रशासनाकडे केली आहे.मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे.
नेरुर-वाघचौडी ग्रामस्थांची सुद्धा अशीच कहाणी
नेरुर वाघचौडी प्रकल्पग्रस्त शेतक-यांची सुद्धा अशीच समस्या आहे. त्यांच्या पारंपरिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुद्धा अत्यंत अरुंद रस्त्यावरून जावे लागते. ही पायवाट एवढी अरुंद आणि दगड धोंड्यांनी भरलेली आहे.चौघांऐवजी केवळ दोघेच जण मृतदेह खांद्यावर घेऊन जाऊ शकतात.त्यामुळे या वाडीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी ओएस-9 या मोकळ्या भूखंडातून जोड रस्त्याची मागणी केली आहे. या भूखंडाच्या बॉर्डरने जर रस्त्यासाठी जागा सोडली तर मग त्यातून रस्ता बनवून ये-जा करण्यासाठी सोयीचे होईल,असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दै.‘पुढारी’च्या प्रतिनिधी समोर ही व्यथा मांडताना ग्रामस्थ श्याम गावडे, मंगेश राऊत, जयराम परब, बाळकृष्ण गावडे, शुभम गावडे, तुषार गावडे, अजित मार्गी, निलेश गावडे, सुरेश गावडे, स्वप्नील गावडे, भालचंद्र गावडे, श्याम महादेव गावडे, जितेंद्र गावडे, रामचंद्र गावडे, सचिन गावडे, किरण गावडे, गोविंद राऊत, धाकू गावडे, चंद्रकांत गावडे, शारदा गावडे, आत्माराम मार्गी आदी उपस्थित होते.
स्मशानभूमीच्या मागणीसाठी 1995 पासून येथील प्रकल्पग्रस्तांचा पत्रव्यवहार संबधीत प्रशासनाकडे सुरु आहे. अगदी गतवेळी उपोषणकर्त्यांना एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकार्यांनी 11 मार्च 2024 रोजी पत्र पाठवून आपल्या मागणीप्रमाणे भूखंड क्र.ओएस 9 मधून जोडरस्ता आणि भूखंड क्र.ओएस 24 मधील 3 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी वाटप करण्याबाबत तत्वतः मान्यता मिळाली असल्याचे कळविले होते. मग अजूनपर्यंत ही मागणी पूर्ण का झाली नाही? या पत्राला तत्कालीन उद्योगमंत्र्यांची सुद्धा पुष्टी आहे. तशा आशयाची टिपणी पत्रात आहे. मग ग्रामस्थांची मागणी का पूर्ण होऊ शकत नाही? नेमके झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? की ज्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना वारंवार शासन दरबारी संघर्ष करावा लागत आहे? असे अनेक प्रश्न यामुळे अनुत्तरित राहतात.