सौंदणे कट परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यूFile Photo
Published on
:
22 Jan 2025, 4:09 am
Updated on
:
22 Jan 2025, 4:09 am
पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा
मागील महिन्याभरापासून वैराग, बार्शी परिसरामध्ये आढळलेला बिबट्या आता मोहोळ तालुक्यात पोहोचल्याची चर्चा आहे. २२ जानेवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सौंदणे कट परिसरातील मोठ्या कॅनलजवळ असलेल्या नितीन पवार यांच्या वस्तीवर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्या सदृष्य प्राण्याने हल्ला चढविला. त्यामध्ये तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहणी करून नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला याची माहिती घेणार असल्याचे सांगितले.
गेल्या चार वर्षापासून प्रत्येक वर्षी याच दिवसांमध्ये करमाळा, माढा, वैराग बार्शीसह मोहोळ तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ चालु असतो. या पार्श्वभूमीवर यावर्षीही मोहोळ तालुक्यात जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात बिबट्याचा वावर आढळुन आल्याची चर्चा आहे. मोहोळ तालुक्यातील सौंदणे कट परिसरात असलेल्या मोठ्या कॅनल जवळ नितीन पवार यांची वस्ती आहे. बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या दरम्यान शेळ्यांचा व इतर जनावरांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने पवार हे घराच्या बाहेर आले. त्यावेळी बिबट्या सदृश्य प्राण्याने शेळीला पकडले होते व ते ओढत होते. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे तो वन्यप्राणी पळून गेला. मात्र त्या ठिकाणी तीन शेळ्या मृत अवस्थेत पडलेल्याचे त्यांना आढळले.
या घटनेनंतर परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या पाहणीनंतरच नेमका शेळ्यांवर कोणत्या प्राण्याने हल्ला केला होता हे समजणार आहे. एक वाजण्याच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने मी बाहेर आलो, त्यावेळी बिबट्याने एका शेळीच्या गळ्याला पकडले होते व तो तिला ओढत होता. मात्र तिच्या गळ्यात दोरी असल्यामुळे तो तिथेच शेळीला धरून बसला होता. मी आरडाओरडा केल्यामुळे तो पळून गेला असल्याचे शेतकरी नितीन पवार यांनी सांगितले.