Published on
:
22 Jan 2025, 1:15 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:15 am
रत्नागिरी ः जमिनीचे खरेदीखत न करता 22 लाख 72 हजार रुपये स्वीकारत फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरीतील सावकारासह एका वकिलाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना 15 मार्च 2017 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत घडली आहे.
नीलेश किर (रा. मिर्या, रत्नागिरी) असे या प्रकरणातील सावकाराचे नाव असून अॅड. महेश नलावडे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात संदीप मधुकर वेलोंडे (45) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संदीप वेलोंडे यांनी यापूर्वी निलेश कीरकडून 10 टक्के व्याजाने 25 हजार रुपये घेतले होते. ते त्यांनी सव्याज परतफेडही केले होते. त्या नंतर वेलोंडे यांचा मित्र सुभाष गराटे यांना 10 लाख रुपयांची गरज होती. वेलोेंडे यांनी रकीर सोबत गराटेची भेट करुन दिली. नीलेश किरने सुभाष गराटे 10 लाख रुपये देऊन रक्कम व्याजासह सहा महिन्यात परत न केल्यास गराटे यांची ओरी येथील 25 एकर जमीन कीर यांच्या नावावर करून देण्याबाबत बोलणी झाली.
सहा महिन्यात गराटे यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे कीरने गराटे यांच्या नावावरील 25 एकर जमीन आपल्या नावावर करून घेतली होती. जमीन नावावर करून दिल्यानंतर गराटे मुंबईला निघून गेले होते व काही दिवसांनी ते पुन्हा रत्नागिरीत आल्यावर त्यांचा किरसोबत वाद झाला होता. तेव्हा त्यांनी मध्यस्थी संदीप वेलोंडेना बोलावून घेतले. पैशाच्या बदल्यात 25 एकर जमीन तुम्हाला गराटे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय आता तुम्ही येथेच थांबवा, असा सल्ला वेलोंडे यांनी दिला. यावेळी नीलेश कीरने तुझे कोरे चेक माझ्याकडे आहेत. तुझी वाटच लावून टाकतो, अशी धमकी वेलोंडे यांना दिली.
दरम्यान, ही जमीन कीरला नको असल्याने कीरने मध्यस्थी वेलोंडे यांनाच ती विकत घेण्याचा तगादा लावला. त्याच्या त्रासाला कंटाळून ही जमीन वेलोंडे यांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कीरने या जमिनीचा दर 25 लाख रुपये सांगितला. वेलोंडे यांचे मित्र देवरूखकर आणि कीर यांचे वकील अॅड. महेश नलावडे यांच्या माळनाका येथील कार्यालयात जमिनीच्या व्यवहाराची बोलणी झाली.
जमिनीचा दर 22 लाख 72 हजार ठरला. अॅड. महेश नलावडेच्या कार्यालयात त्यांनी कीरच्या सांगण्यानुसार जागेचे खरेदीखत तयार केले होते. ठरल्याप्रमाणे रक्कम कीर याला देण्यात आली. त्यानंतर वकिलांसमोर या खरेदीखतावर सह्या झाल्या. कीर याने हातात रक्कम पडल्यानंतर ही रक्कम मी घरी ठेवून येतो, तुम्ही रजिस्टर ऑफिसला या असे सांगितले. त्यानुसार कीर रक्कम घेऊन घरी निघून गेला व वेलोंडे, देवरूखकर नामक व्यक्ती आणि कीरचे वकील अॅड. महेश नलावडे हे तिघे रजिस्टर कार्यालयात पोहोचले. एक तास झाला तरी कीर त्या ठिकाणी आलाच नाही. त्यामुळे अॅड. नलावडेने वेलोंडे आणि देवरूखकर यांना तुमचे खरेदीखत मी करून देतो, तुम्ही काळजी करू नका, असे सांगून त्या दोघांना घरी पाठवून दिले. त्यानंतर कीरशी वेलोंडे आणि देवरूखकर यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू किरने प्रतिसाद दिला नाही. वकिलानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसेही गेले, जमीनही गेली असे लक्षात आल्यानंतर वेलोंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणात पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 308 (3), 3 (5), महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 44, 45 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.