दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मूळ मूर्तीच्या संवर्धनाच्या प्रक्रियेला मंगळवारी प्रारंभ झाला. यानिमित्त पुजार्यांनी धार्मिकविधी केले.
Published on
:
22 Jan 2025, 1:05 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:05 am
जोतिबा डोंगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मूळ मूर्तीच्या संवर्धनाच्या प्रक्रियेला मंगळवारी प्रारंभ झाला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या चार तज्ज्ञांकडून रासायनिक प्रक्रियेचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे मूळ मूर्ती दर्शनासाठी बंद करण्यात आल्याने कासव चौकात ठेवण्यात आलेल्या उत्सवमूर्तीचे भाविक दर्शन घेत होते.
पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मूर्तीचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून मूर्ती संवर्धनासाठी रासायनिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली. हे चार तज्ज्ञ अधिकारी डोंगरावर सकाळी दाखल झाले. यानंतर दहा वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेही आगमन झाले. जिल्हाधिकारी येडगे यांनी अधिकार्यांशी चर्चा केली. मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. हत्यार पूजनानंतर प्रत्यक्ष मूर्ती संवर्धनासाठी रासायनिक प्रक्रियेला सुरुवात झाली.
दरम्यान, दिवसभर मंदिरात हवन, मंत्रोच्चार, पूजा पठण आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम जोतिबा देवस्थानच्या पुजार्यांकडून सुरू होते. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह देवस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी, मुख्य गावकर प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे सांयकाळी जोतिबा डोंगरावर दाखल झाले. त्यांनीही अधिकार्यांशी चर्चा केली. सांयकाळी साडेसात वाजता पहिल्या दिवसाचे काम थांबविण्यात आले. मूर्ती संवर्धनाचे काम शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे.