Published on
:
21 Jan 2025, 1:40 pm
Updated on
:
21 Jan 2025, 1:40 pm
केज : स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत केज नगरपंचायतच्या ७५ लाख रु. च्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे आता केज शहरातील कचरा व त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली जाणार असल्याने स्वच्छ व सुंदर केजचे स्वप्न साकार होईल.
या बाबतची माहिती अशी की, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अभियाना अंतर्गत राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट असून या अंतर्गत शहरातील सर्व प्रकारच्या घन कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे समाविष्ट आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत केज नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्राप्त प्रस्तावास प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या दि. ७ जानेवारी २०२५ रोजीच्या बैठकीत केज नगरपंचायतीच्या घन कचरा व्यवस्थापन प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या प्रकल्पासाठी एकूण ७५ लक्ष ६० हजार ९०४ रू. प्राप्त होणार आहेत. त्या मध्ये ३७ लाख ८० हजार ४५२ रू असा निधी हा केंद्र सरकार कडून उपलब्ध होणार असून ३४ लक्ष २ हजार ४०७ रू असा वाटा हा राज्य सरकारकडून प्राप्त होणार आहे. तर केज नगर पंचायतीचा लोकवाटा ३ लक्ष ७८ हजार ४५ रू असा आहे.
या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याने नगराध्यक्षा सिता बनसोड, उपनगराध्यक्षा शितल दांगट, गटनेते हारून इनामदार यांचे कौतुक होत आहे.