दुचाकींच्या धडकेत शिवारेचा तरुण ठार झाला.
Published on
:
22 Jan 2025, 12:51 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:51 am
बांबवडे : बांबवडे-सरूड रस्त्यावर वाडीचरणच्या हद्दीतील पाटणे फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन विशाल गणपती पाटील (वय 30, रा. शिवारे, ता. शाहूवाडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या विशालच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली. मंगळवारी (दि. 21) दुपारी साडेबाराच्या सुमारास ऊस वाहतूक करणार्या वाहनाला ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाला.
याबाबतची माहिती अशी, विशाल गणपती पाटील आपल्या दुचाकीवरून आजारी वडिलांना रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन बांबवडेकडे निघाला होता. पाटणे फाटा येथे उसाचे वाहन पास करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच समोरून भरधाव वेगाने आलेल्या आदर्श धनाजी गुरव (रा. हातकणंगले) याच्या दुचाकीची धडक बसून विशाल दुचाकीसह रस्त्यावर पडला. डोक्याला जोराचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गणपती दौलू पाटील (60) यांच्या पायाचे हाड तुटले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरव याला मात्र किरकोळ दुखापत झाली.
शाहूवाडी पोलिस ठाण्यातील अंमलदार मानसिंग खताळ, सत्यजित ढाले यांनी घटनेचा पंचनामा केला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. शिवारे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशालचा दोन वर्षांपूर्वी विवाह
अपघातात मृत झालेला विशाल पाटील याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्याला एक लहान मुलगी आहे. घरातील कर्त्या मुलाचे अकाली निधन झाल्यामुळे निराधार झालेल्या पत्नी व लहान मुलीसह संपूर्ण पाटील कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे. साहजिकच, घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.