वास्को : केबलस्टेड पुलाचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. बाजूस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर व मान्यवर. दुसर्या छायाचित्रात ड्रोनद्वारे घेतलेले देशातील पहिला कर्व्ह केबल स्टेड पूल.Pudhari File Photo
Published on
:
22 Jan 2025, 12:56 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:56 am
वास्को : गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने गोव्याला प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त राज्य बनवण्यासाठी 25 वर्षांचा व्हिजन प्लॅन तयार करून तो अंमलात आणा, असे आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मंत्री गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या कर्व्ह केबल स्टेड पुलाचे लोकार्पण करण्यात आले. याबरोबरच इतर साडेतीन हजार कोटी रुपयांच्या नव्या कामांची पायाभरणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्याचे विविध मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते. वास्को येथील मुरगाव बंदर ते वरुणापुरी दरम्यानच्या कर्व्ह केबल स्टेड पुलामुळे वास्को-सडा आणि मुरगाव बंदर या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. या पुलामुळे अनेक भूभाग मुरगाव बंदराला जोडले जातील. ज्यामुळे निर्यातीला वाव मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, गोव्याचे सौंदर्य टिकले पाहिजे, यासाठी निसर्गाचे संवर्धन करून, वन क्षेत्राला टाळून रस्त्यांची निर्मिती होणे गरजेचे आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावरून येणारी वाहतूक राज्यामधून जाते. हे टाळण्यासाठी रिंगरोडची निर्मिती गरजेची आहे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन भूमी संपादन करून केंद्र सरकारला दिल्यास केंद्र सरकार 120 कि.मी. लांबीचा रिंगरोड बनवण्यास तयार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. याबरोबरच झुआरी पुलावर उभारण्यात आलेल्या केबल स्टेड पुलावर विविंग गॅलरीसह हॉटेल उभारण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूमी संपादन आणि इतर बाबी राज्य सरकारने करून दिल्यास आम्ही हा प्रकल्प तातडीने पूर्ण करू. या प्रकल्पासाठी 332 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे काम आम्ही आमच्या जोरावर करू असेही ते म्हणाले. एकूणच गडकरी यांनी राज्यातील अनेक कामांना मंजुरी देत राज्यातील वाहतूक अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
बोरी पुलासाठी 1200कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तेथील भूसंपादन झाल्यावर तेथेही त्वरित काम सुरू होईल, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाचे नुकसान न करता उद्योगवाढ करून रोजगार संधी वाढवावी. एमईएस महाविद्यालय चौक ते बोगमाळो चौक दरम्यानचा उड्डाणपूल व क्वीनीनगर चौक येथे व्हियुपी, झुआरी जोडरस्त्याच्या शेवटपासून ते मडगाव बगलरस्त्याच्या सुरुवातीपर्यंत चौपदरी रस्ता, नावेली ते कुंकळ्ळीपर्यंत चौपदरी रस्ता, बेंदुर्डे ते पोळेपर्यंत चौपदरी रस्ता, फोंडा ते भोमपर्यंत चौपदरी रस्त्यांच्या पायाभरणी आभासी पध्दतीने मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली.
...तर बुलडोझर देईन : गडकरी
महामार्गावर मोजपट्टी लावून अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा द्या. त्या नोटिसांनंतरही ती अतिक्रमणे पाडली गेली नाहीत, तर ती पाडण्यासाठी मी तुमच्यासाठी बुलडोझर देईन, असे त्यांनी स्पष्ट केले. येथील फ्लाईंग झोनमुळेही समस्या उद्भवतात. भारतीय नौदलासही सूचना देऊन जागा मोकळी करून घ्या, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.