वेर्णा : आगीत आलिशान वाहनांचे झालेले नुकसान. Pudhari File Photo
Published on
:
22 Jan 2025, 12:48 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:48 am
वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील एका आलिशान कार सर्व्हिस सेंटरबाहेर सर्व्हिसिंगसाठी ठेवलेल्या एकूण 33 कार मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास लागलेल्या आगीत भस्म झाल्या. यामध्ये एक डेमो कारही होती. प्राथमिक अंदाजानुसार, नुकसानीचा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या घटनेचा वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी कार ठेवण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी सुकलेले गवत आहे. त्यामुळे गवताला आग लागल्यावर तेथील वाहनांनी पेट घेतला. आग आटोक्यात आणण्यासाठी वास्को, वेर्णा, पणजी, मडगाव, फोंडा मुख्यालय, कुडचडे येथील अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलास 25 फेर्या माराव्या लागल्या. तेथील खासगी आस्थापनांतील उपकरणांचाही वापर करण्यात आला. यानंतर आग नियंत्रणात आली. या आगीत त्या कंपनीच्या जनरेटरचेही नुकसान झाले. वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीचे आलिशान कारचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. जवळच्या मोकळ्या मैदानात सर्व्हिसिंगसाठी आणलेल्या कार उभ्या केल्या जातात. दुपारी तेथे काही कार्सनी पेट घेतल्याचे दिसताच तेथे असलेल्या एका फॅक्टरीच्या कामगारांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. वार्याच्या झोतामुळे त्या सर्व कारमध्ये इंधन असल्यामुळे सर्व कार्सनी पेट घेतला. अग्निशमन दलास संपर्क साधल्याने त्यांनीही आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग अधिकच भडकल्याने इतर ठिकाणच्या अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवावांनी गवतावर व वाहनांवर पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. कारमधील इंधनामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांना बरीच धावपळ करावी लागली.
आयडीसीच्या आदेशाचे उल्लंघन : आलेक्स
घटनास्थळावरील कार अपघातांच्या प्रकरणातील असून त्या बेकायदा पद्धतीने आयडीसीच्या जागेत पार्क करण्यात आल्या होत्या. या संदर्भात, संबंधीत वर्कशॉपला आम्ही नोटीसही बजावली होती. आयडीसीचे आदेश न मानणार्या या वर्कशॉपवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नोटीस जारी करूनसुद्धा न काढलेल्या सर्व कार्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. परिसरातील बेकायदा भंगार अड्ड्यांसंदर्भातही सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार तथा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली आहे.