सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना संदेश पारकर. सोबत अवधूत मालणकर, निशांत तोरसकर, रामा सावंत आदी. (छाया ः हरिश्चंद्र पवार)
Published on
:
22 Jan 2025, 1:00 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:00 am
सावंतवाडी ः साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. इकोसेंसिटिव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी? प्रशासन ही परवानगी कशी देतस? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला. याठिकाणी कायदा व नियम धाब्यावर बसवून उत्खनन होत असेल तर या अनधिकृत मायनिंगला शिवसेनेचा विरोध असून, स्थानिकांनी मायनिंगला विरोध केला असता सरपंचांसह लोकप्रतिनिधींंना धमक्या दिल्या जात आहेत. यावरुन जिल्ह्यात वाल्मिक कराड तयार होत असल्याचे दिसून येते. हे बंद न झाल्यास जन आंदोलन उभारु, असा इशारा पारकर यांनी दिला.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अवधूत मलणकर, निशांत तोरसकर, रामा सावंत आदी उपस्थित होते.पारकर म्हणाले, या मायनिंगच्या मागे कोण आहेत ? कोणाचा वरदहस्त आहे हे शोधणे गरजेचे आहे. 16 लाख टन बेकायदेशीर मायनिंग उत्खनन येथून परदेशात निर्यात होत आहे. अवैधरित्या उत्खनन होत असताना दुसरीकडे स्थानिक ग्रामस्थ, डंपर व्यवसायिक यांनी या उत्खननाला तीव्र विरोध केला आहे. अधिकृत मायनिंगला आमचा विरोध नाही. मात्र, बेकायदेशीर उत्खनन खपवून घेणार नाही असा इशारा पारकर यांनी दिला.
गेले दोन महिने साटेली तर्फ सातार्डा गावात अनधिकृत मायनिंग सुरू आहे. याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, खनिकर्म विभाग परिवहन वाहतूक विभाग नागपूर, मडगाव गोवा, कोल्हापूर या कार्यालयाकडे तक्रार करूनही या कार्यालयाकडून गेल्या दोन महिन्यात कोणतेही उत्तर मिळालेले नाही. पत्र व्यवहाराला उत्तरही दिले गेले नाही.
एकीकडे 192 गावांसाठी ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर असताना व त्यात साटेली तर्फ सातार्डा हे गाव येत असल्यामुळे या गावात मायनिंगला परवानगी कशी काय दिली गेली? वन विभागाकडे सुद्धा याबाबतची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान 2021 च्या मायनिंग उत्खननाच्या वेळेला झालेले भूस्खलन आणि यातून शेतकरी,बागायतदार आणि ग्रामस्थांची झालेली नुकसानी व या नुकसानीची भरपाई अद्यापही दिली गेलेली नसताना पुन्हा बेकायदेशीर मायनिंग सुरू केले जात आहे. मायनिंग उत्खननामुळे वन्यप्राणी भरवस्तीत येत असून शेतीचे मोठे नुकसान करू लागले आहेत. त्यामुळे हे मायनिंग तात्काळ बंद करण्यात यावे,अशी मागणी पारकर यांनी केली आहे.
सिंधुदुर्गात बीड पॅटर्न खपवून देणार नाही : संदेश पारकर
मंगळवारी साटेली गावाच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मायनिंग विरोधात ठराव घेतला गेला असल्याचे पारकर यांनी सांगून मायनिंगला विरोध करणार्या या गावच्या महिला सरपंच, महिला सरपंचांचे पती तसेच उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याची दखल संबंधितांनी घ्यावी, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा बीड जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाल्मिक कराड निर्माण होऊ शकतो. सिंधुदुर्गात बीड पॅटर्न आम्ही खपवून देणार नाही, असा इशाराही पारकर यांनी दिला.