Published on
:
22 Jan 2025, 12:55 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:55 am
जालगाव ः दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथील निलेश बाक्कर याच्या खून प्रकरणी पोलीस कोठडीत असणार्या दोन संशयितांना मंगळवारी पुन्हा दापोली न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
दि. 13 जानेवारी रोजी गिम्हवणे येथील निलेश दत्ताराम बाक्कर त्याची पत्नी नेहा व प्रियकर मंगेश चिंचघरकर (रा. पालगड) हे हर्णे समुद्रकिनारी फिरावयास गेले होते. समुद्रावर फेरफटका मारून झाल्यावर त्यातील संशयित आरोपी मंगेश आणि मृत निलेश बाक्कर या दोघांनीही हर्णेतील एका बियर शॉपीमधून बियरची खरेदी केली व तेथून हर्णे बायपास रस्त्यावर ते तिघेही आले. पार्टीचा बेत पूर्ण झाला.
मंगेश हा शाकाहारी असल्याने केवळ निलेशच दारू प्यायला. निलेश याला पत्नी नेहा व मंगेश यांनी दारूचा ओव्हरडोस पाजला. नेहा व मंगेश यांच्या कथित प्रेमाला निलेशचा अडसर होत होता. त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी निलेश याचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला. या नंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट तेथूनच 25 ते 30 किमी अंतरावर असणार्या पालगड पाटीलवाडी येथील विहिरीत त्याचा मृतदेह टाकण्यात आला. यानंतर नेहा हिने पती बेपत्ता असल्याचा बनाव करत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली होती. मात्र दापोली पोलिसांच्या समोर तिचा बनाव फोल ठरला व अवघ्या 48 तासात दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
त्या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दि. 16 जानेवारी रोजी दापोली न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केली असता त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.