Published on
:
22 Jan 2025, 12:59 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:59 am
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून शिवसेना ‘उबाठा’ला मोठा धक्का बसणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत वारंवार सांगत होते. मंत्री सामंत दावोसला असताना आता रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना उबाठाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. उबाठाचे तालुकाप्रमुख व माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे उबाठात खळबळ उडली आहे.
शिवसेना उबाठा पक्षात विधानसभा निवडणुकीपासून काहीशी नाराजीची धुसफूस पदाकिार्यांमध्ये सुरु होती. लोकसभेला 10 हजारहून अधिक लीड असतानाही विधानसभेला उबाठाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. अनेक जि.प. गटात स्वत: शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांनी लक्ष घालत बांधणी केली आणि उबाठाच्या अनेक पदाधिकार्यांना धोबीपछाड दिला. त्यादिवसापासून मात्र उबाठातील पदाधिकारी शांत झाले होते.
उदय सामंत यांनी मतदारसंघात सातत्याने वरचष्मा राखल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या पदाधिकार्यांनी भविष्यातील बदल डोळ्यासमोर ठेवत उबाठातून शिवसेनेकडे मनापासून झुकण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
उबाठाचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांची आमदार सामंत यांच्याशी असणारी मैत्री, गणेशोत्सवानिमित्ताने घराच्या गणरायाचे ना. सामंतांनी घेतलेले दर्शन, यामुळे उबाठातील कार्यकर्त्यांच्या मनात तेव्हापासूनच बंड्या साळवी यांच्याविषयी चुळबूळ सुरु झाली होती.
उबाठाचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र जिल्हाप्रमुखांना दिले आहे. हे पत्र दहा दिवसापूर्वी देऊनही ते गुप्त ठेवण्यात आले होते. हे पत्र जाहीर होताच तालुक्यातील उबाठाच्या शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बंड्या साळवी हे जवळपास 18 वर्ष तालुकाप्रमुख म्हणून शिवसेनेत कार्यरत होते. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाची कमान उंचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते शिवसेनेत कधी प्रवेश करतात याकडे आता शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
एक-दोन दिवसात आणखी राजीनामे?
माजी खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले उबाठाचे कार्यालयीन प्रमुख संदीप सुर्वे यांनीही आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साळवींपाठोपाठ आणखी काही विभागप्रमुख येत्या दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.