राजापूर ः राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना निवेदन देताना नागरिकांचे शिष्टमंडळ.pudhari photo
Published on
:
22 Jan 2025, 12:50 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:50 am
राजापूर ः राजापूर शहरातील एसटी डेपोसमोर मुंबई-गोवा महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी समस्त राजापूरवासीयांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महामार्गाच्या अधिकार्यांसह राजापूर शहरातील सर्वपक्षीय नागरिकांच्या शिष्टमंडळाने महामार्गाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना निवेदनही देण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून, त्यामध्ये राजापूर तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, राजापूर शहरातील राजापूर एस. टी. डेपोसमोरील भागातील काम अद्यापही अपूर्णावस्थेमध्ये आहे. दरम्यान या भागामध्ये भरधाव वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचवेळी या ठिकाणी या मार्गाला ओलांडत असताना एस.टी. डेपोमध्ये सातत्याने एस.टी गाड्या ये-जा करतात. त्या परिसरातील लोकांचीही विविध कामानिमित्ताने या रस्त्यावरुन नेहमीच वर्दळ असते.
आधीच गोवा आणि मुंबई अशा दोन्ही बाजुंनी धावणारी वाहने, त्यामध्ये डेपोतून बाहेर पडणार्या बसेस आणि नागरिकांच्या खासगी गाड्या या सार्यांचा वाढलेल्या वर्दळीतून या ठिकाणी सातत्याने अपघात होण्याचा संभव आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात. त्यामध्ये उड्डाणपूल झाल्यास संभाव्य अपघात टाळणे अधिक शक्य होणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्याचाही सकारात्मक विचार व्हावा तसेच तात्काळ उड्डाणपूलाच्या कामाच्या कारवाईसाठी सुरुवात व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोमवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता कुमावत यांनी नागरिकांसमवेत एसटी डेपोसमोरील महामार्गाची पाहणी केली. यावेळी उड्डाण पुलासोबतच एसटी डेपोसमोरील रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ मार्गी लावावे तसेच या ठिकाणी महामार्गावरील स्ट्रीट लाईट गेल्या महिनाभरापासून बंद असून, त्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. स्थानिक जनतेच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशाराही यावेळी उपस्थितांनी दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अरविंद लांजेकर, विवेक गुरव, शितल पटेल, जगदीश पवार-ठोसर, ऋषिकेश कोळेकर, अजिम जैतापकर, शैबाज खलिफे, नागेश शेट्ये, कमलाकर कदम, रामचंद्र सरवणकर, माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर, विनय गुरव, सौरभ खडपे, जितेंद्र खामकर आदींसह सर्वपक्षीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणार
राजापूर शहरासह तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर एसटी डेपो समोर उड्डाणपूल अत्यावश्यक आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, निलेश राणे यांच्यासह स्थानिक आमदार किरण सामंत यांची भेट घेण्यात येणार असून, हा उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.