न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक होते. त्यामुळे दोन्ही मालिका टीम इंडियाला गमवाव्या लागल्या. तसेच टीम इंडियाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायलनमध्ये पोहचण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. त्यामुळे BCCI ने आता कंबर कसली असून खेळाडूंसाठी नवीन नियमावली जाहीर केली. नवीन नियमांनुसार संपूर्ण दौऱ्या दरम्यान खेळाडूंना कुटुंबासोबत राहण्यास मज्जाव घातला आहे. परंतु अप्रत्यक्षपणे इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने हा नियम चुकीचा असल्याचे म्हणत त्याचा खेळावर फारसा फरक पडणार नसल्याचे म्हंटले आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये उद्या पासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्याने BCCI च्या नवीन नियमांवरून भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “मला वाटतंय की ते महत्त्वाचे आहे. आपण आता अशा युगात राहतो, हे एक आधुनिक जग आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबांना दौऱ्यावर घेऊन जाणे, त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणे खूप चांगले आहे. खेळाडू घराबाहेर बराच वेळ घालवतात. कोरोना नंतर यावर बरीच चर्चाही झाली. मला नाही वाटत की कुटुंबासोबत राहिल्याने त्याचा खेळावर काही परिणाम होत असेल. सर्व काही हाताळले जाऊ शकते. कुटुंबासोबत राहिल्याने घरापासून लांब राहण्याचे ओझे हलके करता येते, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे खूप महत्त्वाचे आहे.” असे बटलर म्हणाला आहे.
काय आहे बीसीसीआयचा नवीन नियम
बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार, परदेशी दौऱ्यावर जर खेळाडू 45 दिवस राहणार असेल, तर तो खेळाडू आपल्या कुटुंबाला दोन आठवड्यासाठी सोबत घेऊन जाऊ शकतो. तसेच दौरा छोटा असेल तर हा कालावधी 7 दिवसांचा होईल. त्याचबरोबर खेळाडू सामन्यासाठी आणि सराव सत्रासाठी संघासोबतच प्रवास करतील. जर एखाद्या खेळाडूला कुटुंबासोबत प्रवास करायचा असेल, तर त्याला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.