Published on
:
22 Jan 2025, 1:02 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:02 am
बेळगाव : सध्या दहावीची पहिली पूर्व परीक्षा सुरु असून शेवटचा पेपर 27 जानेवारीला होणार आहे. ही परीक्षा संपण्याआधीच शिक्षण खात्याने दुसर्या पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. ही परीक्षा 30 जानेवारीपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांमधील दहावीच्या वार्षिक परीक्षेची भिती दूर व्हावी, यासाठी या परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे.
पहिल्या पूर्व परीक्षेला सोमवारपासून (दि. 20) पासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी प्रथम भाषेचा पेपर होता. मंगळवारी (दि. 21) द्वितीय भाषेचा पेपर होता. मात्र, बेळगावात काँग्रेसतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याने सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे, द्वितीय भाषेचा पेपर झाला नाही. हा पेपर आता 27 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर दोन दिवस विद्यार्थ्यांना विश्रांती देऊन 30 जानेवारीपासून दुसरी पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
दरवर्षी पूर्व परीक्षा गांभिर्याने घेतली जात नाही. मात्र, दरवर्षी निकालात घसरण होत असल्याने शिक्षण खात्यानेसुद्धा ही परीक्षा काटेकोरपणे आयोजित करण्यास सुरवात केली आहे. परीक्षा काळात डायटचे अधिकारी शाळांना भेटी देत आहेत. परीक्षा कोणत्या पध्दतीने शाळेने आयोजित केली आहे. याची पाहणी केली जात आहे.
एकंदरीत परीक्षेचे गांभीर्य शाळेला असले पाहिजेत. तसेच विद्यार्थ्यांनाही वेळापत्रक आणि पेपर सोडविण्याचा सराव व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निकालवाढीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे.