बीड खंडणी प्रकरणातील नवीन CCTV समोर:अजून किती पुरावे द्यायचे? मुख्यमंत्री आणि पोलिस कोणता मुहुर्त शोधतायत? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
3 hours ago
1
बीड हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील आरोपींचे एकत्रित असल्याचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 29 नोव्हेंबर 2024 रोजीचे हे फुटेज असून त्याच दिवशी आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. आवादा कंपनीकडे मागितलेली खंडणी ही खंडणी नव्हती, तर तो निवडणूक फंडसाठी मागितलेला पैसा होता, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस कोणता मुहुर्त शोधतायत? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड अटकेत आहे. त्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा तपास सुरू आहे. वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून विष्णू चाटे याने कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्हीत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींसह निलंबित पोलिस अधिकारीही सोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे बोलले जात आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत हल्लाबोल केला. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
वाल्मिक कराड हाच खरा गुन्हेगार आहे. पोलिसांसोबत हातमिळवणी करुन खंडणी वसुली या सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाली, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच ती खंडणी नव्हती, तर तो निवडणूक फंडसाठी मागितलेला पैसा होता, असा दावा त्यांनी केला आहे. वाल्मिक कराड छोटा आका आहे. धनंजय मुंडेंनी उघडपणे वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे, असे सांगितले होते. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अशी मागणीही आव्हाड यांनी केली. अजून किती पुरावे द्यायचे?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस कोणता मुहुर्त शोधत आहेत? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पुराव्यासोबत छेडछाड केली जाऊ नये
दरम्यान, खंडणी प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सदर माहिती अतिशय धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. आता पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे या पुराव्यासोबत छेडछाड केली जाऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. आवादा कंपनीमध्ये वाद होतो. यावेळी गावातील अनेक लोक देखील त्याठिकाणी असतात. मग त्यावेळी हे लोक देखील उपस्थित होते, असे गावातील लोकांनी आतापर्यंत का सांगितले नाही? लोकांवर कोणाचा दबाव होता? असा सवालही त्यांनी केला आहे. हे ही वाचा... बीड हत्याकांडातील सर्व आरोपी एका फ्रेममध्ये:खंडणी प्रकरणातील CCTV समोर; वाल्मीक कराड, विष्णू चाटेसह पोलिस अधिकारीही उपस्थित बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी या सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही पोलिस अधिकारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज मोठा पुरावा मानले जात आहे. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)