BCCIने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या जर्सीवर ‘पाकिस्तान’ हे नाव छापण्यास नकार दिला आहे.
Published on
:
21 Jan 2025, 1:55 pm
Updated on
:
21 Jan 2025, 1:55 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Champions Trophy BCCI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या जर्सीवर ‘पाकिस्तान’ हे नाव छापण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तान हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अधिकृत यजमान देश आहे. पण भारताने पाकिस्तानात एकही सामना न खेळण्याचे कडक धोरण अवलंबले आहे. परिणारी यंदाच्या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनुसार पाकिस्तान आणि दुबईमध्ये करण्यात आले आहे. दरम्यान, भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत.
पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने बीसीसीआयवर क्रिकेटचे राजकारण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, जे खेळासाठी अजिबात चांगले नाही,’ असे पीसीबी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
अलिकडेच, बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच्या एका कार्यक्रमासाठी संघाचा कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून पीसीबी नाराज आहे.
पीसीबीला आयसीसीचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा
पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बीसीसीआय भारतीय संघाच्या कर्णधाराला उद्घाटन समारंभासाठी पाकिस्तानला पाठवू इच्छित नाहीत. आता असे वृत्त आहे की ते त्यांच्या जर्सीवर यजमान देश असणा-या पाकिस्तानचे नाव छापू इच्छित नाहीत. आमचा असा विश्वास आहे की आयसीसी हे होऊ देणार नाही आणि पाकिस्तानला पाठिंबा देईल.’
भारताचा 20 फेब्रुवारी पहिला सामना
भारतीय संघ गट अ मध्ये आहे. रोहितसेना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तान आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध लढत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी दुबई येथे आणि दुसरा सेमीफायनल 5 मार्च रोजी लाहोर येथे खेळला जाईल. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर विजेतेपदाचा सामना लाहोरऐवजी दुबईमध्ये (9 मार्च) खेळवला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या रूपात 3 वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) आणि रवींद्र जडेजा.