शिक्रापूर (ता. शिरूर) येथून 4 महिन्यांच्या बाळासह महिला बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (दि 19) उघडकीस आली. बेबीकुमारी धर्मेंद्रकुमार चौधरी (वय 26) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. धर्मेंद्रकुमार रामकिरण चौधरी (वय 38 वर्षे, दोघे रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर. मूळ रा. त्रिगुण डेहरी, जि. रोहतास, बिहार) याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली.
धर्मेंद्रकुमार चौधरी हा कामाच्या निमित्ताने सणसवाडी येथे गेला होता. या वेळी त्याची सासू तसेच पत्नी बेबीकुमारी ही त्यांच्या 4 महिन्यांच्या बाळासह घरात होती. रात्री धर्मेंद्रकुमार घरी आला असता त्यांना पत्नी व मुलगा घरात दिसले नाहीत. त्यामुळे त्याने सासूकडे विचारपूस केली असता बेबीकुमारी ही बाहेरून येते म्हणून गेली व ती परत आली नसल्याचे तिने सांगितले. धर्मेंद्रकुमारने सर्वत्र पत्नीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
बेबीकुमारीचा रंग सावळा असून केस काळे, उंची पाच फूट तीन इंच, अंगात हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिच्यासोबत 4 महिन्यांचे बाळ आहे. तिच्याबद्दल माहिती मिळाल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस हवालदार हनुमंत गिरमकर हे तपास करत आहेत.