स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सावेडी, शहरातून ११ किमी सायकल रॅली:नागरिक, विद्यार्थी, संघटनांच्या सहभागातून अमरधाम परिसरात स्वच्छता मोहीम

2 hours ago 2
स्वच्छता ही सेवा अभियानाच्या पाचव्या दिवशी मनपातर्फे अमरधाम स्मशानभूमी व बाळाजी बुआ विहीर परिसरात नागरिक, शालेय विद्यार्थी व संघटनांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच, नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ अहमदनगर यांच्या सहकार्याने सावेडी उपनगर व शहरातून ११ किलोमीटर सायकल रॅली काढण्यात आली. यात शंभरहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. अमरधाम व बाळाजी बुआ येथील स्वच्छता अभियानात आयुक्त यशवंत डांगे, धर्मवीर प्रतिष्ठानचे सदस्य, केशवराव गाडीलकर शाळेचे विद्यार्थी, मनपाशी संबंधित ठेकेदार, मनपा अधिकारी सहभागी झाले होते. गाडीलकर विद्यालयाचे विद्यार्थी, महिला बचत गट प्रतिनिधींनी मनपा कर्मचाऱ्यांसमवेत साफसफाईच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला. या मोहिमेत अमरधाम स्मशानभूमीमधील अनेक दिवसांपासून साचलेला पालापाचोळा, अंत्यविधीसाठी, दशक्रिया विधीसाठी वापरून झालेले व इतरत्र टाकलेले साहित्य, झाडांच्या फांद्या, प्लास्टिक कचरा संकलन करून स्वच्छता करण्यात आली. अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी रविवारी विविध उपक्रम राबवण्यात आले. यात मनपा व सायकलिंग फेडरेशन ऑफ अहमदनगर असोसिएशनतर्फे प्रोफेसर चौक ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. स्वच्छतेवर आधारित जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले गणे संपूर्ण रॅली मार्गावर वाजवण्यात आले. या रॅलीचे नागरिकांनी ठिकठिकाणी चौकात स्वागत केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article