अमेरिकेकडून भारताला मोठं गिफ्ट; मिळाला पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प file photo
Published on
:
23 Sep 2024, 5:12 am
Updated on
:
23 Sep 2024, 5:12 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताला अमेरिकेसोबत परिवर्तनात्मक सहकार्याअंतर्गत पहिला राष्ट्रीय सुरक्षा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प (India USA semiconductor project) मिळणार आहे. या प्रकल्पात दोन्ही देशांतील लष्करी हार्डवेअर तसेच महत्त्वपूर्ण दूरसंचार नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरण्यासाठी चिप्स तयार करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात शनिवारी विल्मिंग्टनमध्ये झालेल्या चर्चेनंतर या महत्त्वाकांक्षी भारत-अमेरिका संयुक्त प्रकल्पाची घोषणा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमधील इनडोअर स्टेडियममध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. त्यानंतर मोदींनी जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) गोलमेज बैठकही घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाठीच्या कण्याशिवाय शरीराचा काहीच उपयोग नाही, त्याचप्रमाणे चिपशिवाय तंत्रज्ञान निरर्थक आहे. त्यामुळे या क्षेत्रातही आम्ही काम करत आहोत. हे कार्य जगात खूप पूर्वीपासून सुरू झाले आहे. आम्ही थोडा उशीरा सुरू करत आहोत. पण आपली ताकद अशी आहे की आपण जेव्हाही सुरुवात करतो तेव्हा पूर्ण वेगाने सुरू करतो. आम्ही 5G तंत्रज्ञानामध्ये खूप मागे होतो, परंतु आता आम्ही आघाडीवर आहोत. त्यामुळे भारत सेमीकंडक्टरबाबत गंभीर आहे. आम्ही हे लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करू. यासाठी आमचा रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म असा मंत्र आहे, असे मोदी म्हणाले. (India USA semiconductor project)