हव्याप्रमंच्या विजयादशमी महोत्सवाला अखंड भारताचे स्वरूप:25 राज्यातील 3000 विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती

4 days ago 3
दसरा मैदानावर २५ राज्यातील तब्बल ३००० विद्यार्थ्यांनी पारंपरिक, आधुनिक खेळ, शस्त्रकला, योग-व्यायामासह संस्कृतीचे प्रदर्शन, चित्तथरारक कवायती करून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विजयादशमी महोत्सवाला अखंड भारताचे स्वरूप दिले. एचव्हीपीएमच्या विजयादशमी महोत्सवास शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुरुवात झाली. प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेत आयोजित महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, इंटरनॅशनल मल्लखांब फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी धरमवीर सिंग, मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके, महावीर पेंढारी, शशिबाला सिंग आदी उपस्थित होते. आ. रवी राणा व पोलिस उपायुक्त अमरावती शहर गणेश शिंदे यांनी महोत्सवाला भेट देत शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी डंबेल्स कवायत, मल्लखांब, रोप मल्लखांब, दंड बैठक, रायफल ड्रील, गोळा ड्रील, विटा फेक, भाला ड्रील, सिंगल दांडपट्टा, डबल दांड पट्टा, दांडपट्टा ड्रील, लेझीम, सिंगल लाठी, दो हाती तलवार, ढाल तलवार, अॅरोबिक्स, योगा ड्रील, जिम्नॅस्टिक्स, रशियन ड्रील, बॉक्सिंग, तायक्वांदो, शरीर सौष्ठव, टॉर्चेस मार्चिंग व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय पांडे, डॉ. अरुण खोडस्कर, प्रा. जयंत गोडसे, आनंद महाजन यांनी केले. विजयादशमी महोत्सवाचे समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचा सत्कार : नुकताच रशिया येथील रशियन इंटरनॅशनल ऑलिम्पिक युनिव्हर्सिटी (सोची) येथे भारतीय पारंपरिक खेळ व एचव्हीपीएमच्या क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीबाबत तीन परिषद झाल्या. मंडळाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांनी या परिषदेत एचव्हीपीएमचे व देशाचे प्रतिनिधीत्व केले. सोबतच एचव्हीपीएमद्वारे नुकतेच जर्मनी येथील विद्यार्थ्यांना मल्लखांबचे प्रशिक्षण देण्यात आले. याकरिता मंडळाचे प्रा. मयूर दलाल, प्रा. प्रणव चेंडकेसह विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार केला. दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षण : एचव्हीपीएमच्या दसरा महोत्सवात सादर होत असल्या चित्तथरारक कवायती, खेळ आणि व्यायाम पाहता अशा प्रकारचे शिक्षण आणि प्रशिक्षण आजच्या विद्यार्थ्यांना नितांत गरजेचे आहे, जे वर्तमान शिक्षण व्यवस्थेतून मिळत नाही. अनेक दशकांपासून एचव्हीपीएम क्रीडा क्षेत्रात कार्य करत आहे. येथील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो. अशा प्रकारचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रत्येक युवकाने आत्मसात करावे, असे आवाहन मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी व्यक्त केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article