1299 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यताPudhari
Published on
:
31 Jan 2025, 2:08 am
Updated on
:
31 Jan 2025, 2:08 am
पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.30) विधानभवनमध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना मिळून एकूण 1 हजार 299 कोटी 58 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला व 753 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मान्यता देण्यात आली.
मान्यता दिलेल्या आराखड्यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन 2025- 26 च्या 1 हजार 91 कोटी 45 लाख रुपयांचा प्रारूप आराखडा व 700 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 145 कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेकरिता 63 कोटी 13 लाख रुपयांचा प्रारूप आराखडा आणि 53 लाख 1 हजार रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मान्यता दिली आहे.
एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करा
पुणे शहर आणि जिल्ह्यात खूप ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक महत्त्वाची ठिकाणे, गडकिल्ले, स्मारके असून तेथील संवर्धनाचे काम सुरू आहे. ही सर्व ठिकाणे पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
ते म्हणाले, या आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल. तसेच, कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावेत. राज्याच्या पर्यटन विभागाकडूनही जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
आदर्श शाळा उपक्रम राबवावा
पुणे जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनीही आपल्या शाळांचा अशा पद्धतीने विकास करण्याचा आराखडा तयार करून सादर करावा. या शाळांचा दर्जात्मक विकास करण्यासाठी अशासकीय स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेता येईल, असेही अजित पवार म्हणाले. जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावा, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.
अवास्तव दर आकारणार्या रुग्णालयांवर कारवाई
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी आपल्या रुग्णालयात या आजारावरील उपचारासाठीची पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. उपचारांसाठी अवास्तव दर करणार्या रुग्णालयांकडून उपचारांची देयके कमी करून रुग्णांना दिलासा द्यावा. दराबाबत ऐकत नसलेल्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 2025- 26 मराठी उपक्षेत्रनिहाय प्रस्तावित नियतव्यय पुढीलप्रमाणे:
कृषी व संलग्न सेवांसाठी सात ग्रामीण विकासासाठी 175 कोटी, पाटबंधारे व पूरनियंत्रणासाठी 23 कोटी 26 लाख, ऊर्जाविकासासाठी 85 कोटी, उद्योग खाणकामासाठी 77 कोटी 76 लाख, परिवहनसाठी 185 कोटी, सामान्य आर्थिक सेवेसाठी 29 कोटी, सामाजिक सामूहिक सेवा 390 कोटी 11 लाख, नावीन्यपूर्ण योजनांसाठी 55 कोटी 12 लाख याप्रमाणे एक हजार 91 कोटी 45 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिली आहे. याशिवाय 700 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी तीन कोटी 40 लाख, ऊर्जाविकाससाठी 10 कोटी 15 लाख, उद्योगासाठी 10 लाख, परिवहनासाठी 10 कोटी, सामाजिक सामूहिक सेवांसाठी 194 कोटी 7 लाख, नावीन्यपूर्ण योजनांसाठी चार कोटी 35 लाख रुपये अशा प्रस्तावित नियतव्ययास मान्यता दिली आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी 14 कोटी 15 लाख, ग्रामीण विकास चार कोटी 85 लाख, पाटबंधारे व पूरनियंत्रण एक कोटी 30 लाख, ऊर्जाविकास 3 कोटी 43 लाख, उद्योग खाणकाम 20 लाख, परिवहन आठ कोटी 97 लाख, सामाजिक सामूहिक सेवा 28 कोटी 94 लाख, नावीन्यपूर्ण योजना एक कोटी 45 लाख अशा एकूण 63 कोटी 13 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यासह 53 कोटी एक लाख रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता दिली आहे. बैठकीत सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत झालेल्या खर्चाचा व कामांचाही आढावा घेण्यात आला.
पुणे आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र
जिल्ह्यात पुणे मॉडेल पीएचसी अर्थात आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमाची चांगल्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, अशाही सूचना पवार यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
‘जीबीएस’ आजाराबाबत घेतला आढावा
गुलियन बॅरे सिंड्रो अर्थात ‘जीबीएस’ आजाराबाबतही आढावा पवार यांनी घेतला. जिल्ह्यात आजअखेर या आजाराचे 129 रुग्ण असून पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपाचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह काशीबाई नवले रुग्णालय, भारती विद्यापीठ रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आदी ठिकाणी या उपचारांची सोय असलेल्या रुग्णालयांशी संपर्कात असल्याचे पुणे मनपा आयुक्तांनी सांगितले.