नाशिक : दुचाकी चोरी प्रकरणी पकडलेले दोघे संशयित व जप्त केलेल्या दुचाकी. समवेत भद्रकाली पोलिसांचे पथक.Pudhari
Published on
:
31 Jan 2025, 4:32 am
नाशिक : मौजमजा करण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या चौघांना भद्रकाली पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून पकडले आहे. चौघांपैकी दोघे अल्पवयीन संशयित आहेत. या चौघांनी संगमनेर शहरासह नाशिकमधून पाच दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. भद्रकाली पोलिसांनी चौघांकडून ९ लाख रुपयांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
जुने नाशिक येथील मोदकेश्वर गणपती मंदिराजवळून रविवारी (दि.२६) मध्यरात्री चोरट्याने एमएच १५ जेव्ही ८२९९ क्रमांकाची स्पोर्स्टस् बाइक चोरली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, गुन्हे पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सत्यवान पवार यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संशयित असल्याचे शोधले. त्यानुसार पवार यांच्यासह पोलिस हवालदार कय्युम सय्यद, सतीश साळुंके, शिपाई नीलेश विखे, गुरू गांगुर्डे व दयानंद सोनवणे यांच्या पथकाने शिर्डी येथे जाऊन संशयितांची धरपकड केली. त्यात गणेश बाळासाहेब गायकवाड (२०, रा. शिर्डी, ता. राहता), अभिजित रामदास कांबळे (१९, रा. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांच्यासह दोन विधिसंघर्षित मुलांना पकडले. त्यांच्याकडून भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चारेलेल्या २ व संगमनेर शहरातून चोरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. न्यायालयाने गणेश व अभिजित यांना शनिवार (दि. १)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.