प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
:
31 Jan 2025, 6:33 am
Updated on
:
31 Jan 2025, 6:33 am
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे.
धोंडाळपाडा परिसरात गेल्या तीन -चार दिवसांपासून येथील शेतकऱ्यांना रात्री बिबट्याचे दर्शन होत असल्याने रात्री शेतात पिकांना पाणी देणारे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. त्यात भरीस भर म्हणून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या वस्तीवरील घराच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी आराडाओरड करून बिबट्याला पिटाळून लावले. या परिसरातील बहुतांशी ग्रामस्थ शेतामध्ये वस्ती करून राहतात. अनेक जण रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जातात. बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी धास्तावले आहेत. सदर बिबट्या मादी बिबट्या असून आणि तिच्यासोबत बछडेही असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बिबट्याचा शेतातील वस्तीवर वावर वाढला आहे. मळ्यात वस्ती करून राहणाऱ्या शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेची चिंता लागली आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
-लता गायकवाड, सरपंच