सनकी प्रियकर गेला प्रेयसीच्या घरी अन्...file photo
Published on
:
31 Jan 2025, 9:00 am
Updated on
:
31 Jan 2025, 9:00 am
पुणे: पूर्वी सोबत काम करत असताना मैत्री झालेल्या तरुणीचा विवाह झाल्यानंतर एकतर्फी प्रेम करणार्याला तिच्या पतीने हटकले, याचा राग मनात धरून सनकी प्रियकराने प्रेयसीच्या दोन दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्या. ही घटना रामटेकडी परिसरात गुरुवारी (दि.30) पहाटे पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अहमद पठाण (वय 40) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद पठाण आणि संबंधित तरुणी सुरुवातीला एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झाली. मात्र, याच कालावधीत तिचा विवाह झाला. त्यामुळे तिने विवाहानंतर त्याच्याबरोबर बोलणे बंद केले.
अहमदचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले होते. बुधवारी ती एका लग्न समारंभात पतीसोबत गेली होती. त्या लग्नात अहमदही आला होता. तेथे अहमदची आणि तिच्या पतीमध्ये बाचाबाची झाली. या वेळी तिने त्याला खडसावले. याचाच राग मनात धरून गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास महिला राहत असलेल्या सोसायटीत अहमद पोहोचला. त्याने सोबत आणलेले पेट्रोल गाडीवर ओतले आणि गाडीला आग लावली. या वेळी आगीत महिलेच्या पतीच्या गाडीसोबत आणखी एक गाडीही जळून खाक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि अहमद दोघे पूर्वी एकाच पबमध्ये बाउंसर म्हणून काम करत होते. तेथे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीही झाली. याच दरम्यान तिचे लग्न झाले. परंतु, तिच्या पतीला दोघांचे भेटणे आवडत नव्हते.
तिनेही त्याच्यासोबतचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध तोडले होते. तरी देखील तो तिला कॉल करून भेटण्यासाठी बोलावत होता. तिने त्याला नकारही दिला. एका लग्न समारंभात तो तिला रोखून पाहत असतानाचा प्रकार तिच्या पतीने पाहिल्यानंतर पतीने त्याच्या कानाखाली मारली होती. याचाच राग मनात धरून त्याने तिच्या पतीची गाडी जाळली.