Published on
:
31 Jan 2025, 6:32 am
Updated on
:
31 Jan 2025, 6:32 am
पाथर्डी तालुका : शहरातील प्रमुख रस्त्यांवरची शेकडो अतिक्रमणे काढण्याची मोहीम गुरुवार (दि. 30) सकाळपासून सुरू करण्यात आली. कारवाई तोंड पाहून होत असल्याने काही अतिक्रमणधारक व व्यापार्यांनी प्रशासनावर आक्षेप नोंदवत अधिकार्यांना घेराव घालून जाब विचारला. आमच्या टपर्या तोडल्यात ह्याही टपर्या तोडा; एकाला एक न्याय, दुसर्याला एक हे चालणार नाही सर्वांना समान न्याय द्या, अशी भूमिका काही अतिक्रमणधारकांनी करत प्रशासनाला सुनावले. काही व्यापार्यांची अतिक्रमणे काढण्यातही पाथर्डी नगरपरिषदेने दुजाभाव केल्याची भूमिका घेतल्याने व्यापारीवर्गातही नाराजी पसरली आहे.
पाथर्डी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग या विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी संयुक्तरीत्या अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली. तीन जेसीबी यंत्राच्या साह्याने अजंठा चौक, चिंचपूर रोड, उपजिल्हा रुग्णालय परिसर, नाईक चौक, कोरडगाव चौक, अहिल्यानगर रोड, शेवगाव रोड, कोरडगाव रोड या परिसरातील व रस्त्यांच्या बाजूची असलेली शेकडो अतिक्रमणे जेसीबी यंत्रांच्या साह्याने उखडून काढली. काहींनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढले, तर काहींचे अतिक्रमण प्रशासनाने बळाचा वापर करून काढले. अतिक्रमण काढण्याबाबत सर्वांना समान न्याय द्या, तोंडे पाहून अतिक्रमण काढू नका, असा सूर नागरिकांमधून कारवाईदरम्यान उमटला. अतिक्रमण काढल्यानंतर अनेक टपर्या, सामान व इतर साहित्य रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाली. एकाच दिवशी राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग सर्वच प्रमुख रस्त्यांवरची अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला अजंठा चौक व उपजिल्हा रुग्णालय परिसर येथून अतिक्रमणाला सकाळी 10 वा. सुरुवात करण्यात आली. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी संतोष लांडगे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत बडे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता लोभाजी घटमळ मोहिमेत सहभागी झाले होते.
सकाळी सुरू झालेली कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. अतिक्रमणे काढल्यानंतर अनेक जण विस्थापित झाले आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी होऊ लागली आहे. शहरातील अजंठा चौक, कोरडगाव चौक व नाईक चौक येथील असलेले अतिक्रमणे निघाल्याने वाहतुकीला होणारा अडथळा दूर झाल्याने सर्वसामान्यांंमधून प्रशासनाचे स्वागत होत आहे. अतिक्रमणादरम्यान पाथर्डी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा या वेळी अतिक्रमण मोहिमेत सहभागी झाला होता. या वेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
समन्वयाअभावी कारवाईत अडथळा
राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग व पाथर्डी नगरपरिषद यांच्या जागेवर असलेले अतिक्रमणे हटविण्याची मोहीम गुरुवारी सकाळी सुरू केली. मात्र, या तिन्ही विभागाचा योग्य समन्वय व नियोजन नसल्याने अतिक्रमण काढण्यासाठी अडथळा निर्माण झाला. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या साहित्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
वयोवृद्धेकडून अधिकार्यांना धन्यवाद
शहरातील प्रमुख चौक आणि रहदारीचे असलेले नाईक चौक, कोरडगाव चौक, अजंठा चौक येथील अतिक्रमण काढल्यानंतर वाहतूक कोंडी बंद होऊन रस्ता सुरळीत वाहत असल्याचे पाहून देवाबाई धायतडक या वयोवृद्धेने उपस्थित असलेल्या प्रशासनाच्या अधिकार्यांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.
शेळके व बडे यांच्यात शाब्दिक चकमक
मराठी शाळेबाहेरील अतिक्रमण काढत असताना प्रशासनाने आखलेल्या रेषेच्या आतमधील काही गाळेधारकांचे नुकसान केले. या मुद्द्यावरून युवा नेते प्रशांत शेळके व बांधकाम विभागाचे वसंत बडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अतिक्रमणाची मोहीम ही पुढील आठ दिवस सुरू राहणार आहे.