सेनगाव पंचायत समितीमधील कपातीच्या रकमेचे 200 पेक्षा अधिक धनादेश संशयास्पद:वैयक्तिक बँक खात्यात वटविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट

2 hours ago 1
सेनगाव पंचायत समिती मधील कपातीच्या रकमेचे सुमारे 200 पेक्षा अधिक धनादेशावर संंशय व्यक्त करण्यात आला असून सदर धनादेश वैयक्तिक बँक खात्यात वटविण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीवरूनच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत. तुर्तास पंचायत समितीचे काही कर्मचारी तर काही माजी पदाधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सेनगाव पंचायत समिती अंतर्गत झालेल्या बांधकामामध्ये कंत्राटदारांकडून कपात करण्यात आलेल्या जीएसटी, कामगार विमा, 10 टक्के ठेवी यासह इतर कपातीच्या रकमांची चौकशी सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य व लेखा वित्त अधिकारी दिगंबर माडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीकडून या प्रकाराची चौकशी सुरु आहे. यामध्ये मागील पाच वर्षात किती रकमा कपात करण्यात आल्या होत्या. त्या रकमा योग्य बँक खात्यात जमा करण्यात आल्या आहेत काय, तसेच धनादेश कोणाच्या नावे देण्यात आले याची चौकशी केली जात आहे. यामध्ये चार सदस्य असलेल्या समितीने पंचायत समितीचे सर्व दस्ताऐवज तपासणी सुरु केली असून सदर काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, मागील पाच वर्षात देण्यात आलेल्या कपातीच्या रकमेच्या धनादेशापैकी सुमारे २०० पेक्षा अधिक धनादेशावर शंका व्यक्त करण्यात आली आहे. सदर धनादेश शासकिय बँक खात्यात जमा करण्या ऐवजी वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यात आल्याचा संशय असून त्यानुसार प्राथमिक चौकशीमध्ये काही धनादेश वैयक्तिक बँक खात्यात वटविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर लेखा विभागाने बँकेला पत्र देऊन या धनादेशा संदर्भात सविस्तर मा्हिती मागवली आहे. यामध्ये सहा बँकांनी माहिती सादर करण्याचे काम सुरु केले असून काही बँकांनी माहिती सादर केली आहे. त्यातून सेनगाव पंचायत समितीचे काही कर्मचारी व माजी पदाधिकारी सध्या तरी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दरम्यान, सदर अहवाल तयार करण्याचे काम सुरु असून अहवाल अंतिम टप्प्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले. सदर अहवाल वरिष्ठांकडे सादर केल्यानंतरच त्यावर पुढील कारवाईचा निर्णय होणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article