Published on
:
31 Jan 2025, 4:31 am
Updated on
:
31 Jan 2025, 4:31 am
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला वेग दिला असून या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह, खासदार, आमदारांना पत्र पाठवत सिंहस्थ कामांबाबत सूचना मागविल्या आहेत.
नाशिक शहरात 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्याची प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंहस्थासाठी गत 14 डिसेंबर 2023 रोजी 45 सदस्यीय शिखर समितीसह चार समित्यांची घोषणा केली आहे. महापालिका प्रशासनासह विविध शासकीय विभागांनी सिंहस्थ कामांसाठी विभागनिहाय स्वतंत्र आराखडे तयार केले आहेत.
नाशिक महापालिकेचा सिंहस्थ आराखडा 7 हजार 767 कोटींपर्यंत गेला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम, पोलिस विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, नाशिक विकास प्राधिकरणासह विविध विभागांनीही सुमारे साडेसात हजार कोटींपर्यंत आराखडे सादर केल्याने सर्व विभागांचा एकत्रित आराखडा पंधरा हजार कोटींच्या घरात गेला आहे. दरम्यान, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकचा कुंभमेळा व्हावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित सिंहस्थाच्या तयारीसंदर्भात बैठक होवून नियोजनाला चालना देण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता या सिंहस्थ नियोजनात शहरातील लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, खासदार, शहरातील चार आमदारांकडून सूचना व मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 17 जानेवारीला झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, नाशिकमध्ये कुंभमेळा होत असताना जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, खासदार तसेच चारही आमदारांना या बैठकीतून डावलण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटला होता. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सिंहस्थाबाबत सूचना मागविण्यात आल्या असल्याची चर्चा आहे.