200 किलो हळद-कुंकू, 600 किलो फुलांची उधळण:महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डी त जल्लोषात स्वागत

2 hours ago 1
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची पालखी रविवारी (६ ऑक्टोबर) सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पाथर्डी शहरात दाखल झाली. यावेळी तब्बल २०० किलो हळद-कुंकू, ६०० किलो फुलांची उधळण करण्यात आली. आई राजा उदो उदो, कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय, पालखी आई की जय अशा जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत हळद-कुंकूवाची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आल्याने शहरातील रस्ते लाल-पिवळ्या रंगाने माखले होते. राहुरी येथून श्रीक्षेत्र तुळजापूरकडे निघालेल्या बुऱ्हाणनगर येथील मानाच्या ऐतिहासिक पालखीचे शहारातील जिल्हा परिषद मराठी मुले शाळेसमोर आगमन झाले. यावेळी आकर्षक फुलांनी सजवलेल्या मंचावर पालखी विराजमान करण्यात आली. त्यांनतर पालखीचा शृंगार करण्यात येऊन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीची अजंठा चौक, जय भवानी चौक, सुतार गल्ली, कसबा पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनिमंदिर दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. भाविकांमध्ये ओसंडून वाहणारा भक्तिभाव, उत्साह, आई जगदंबेचा गजर, यामुळे शहर दुमदुमून गेले. महिला भाविकांनी पालखीपुढे देवीची भक्तिगीते सादर करीत फुगड्या घालत घेर धरला. शनि मंदिरासमोर मिरवणूक आल्यावर पालखीची विधिवत पूजा, आरती करुन मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. पालखीचे मानकरी भगत परिवारातील सदस्यांचा फेटा, नारळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तब्बल अडीच ते तीन तास पालखी मिरवणूक सोहळा रंगला होता. पालखी सोहळा उत्सव समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. दरम्यान, श्रीक्षेत्र मोहटा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपली वाहने थांबवून पालखी आईच्या दर्शनाचा लाभ घेतला. या सोहळ्यासाठी शहरातील साठे पाटील परिवारासह तुळजाभवानी उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या मिरवणुकीनंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे वातावरण भक्तमीय झाले होते. फुलांच्या पाकळ्यांनी सजला मिरवणूक मार्ग मिरवणूक मार्गावर महिलांनी सडारांगोळी करुन, ठिकठिकाणी औक्षण केले. खणानारळाने ओटी भरून मुक्त हस्ते फुलांची उधळण केली. संपूर्ण मिरवणूक मार्ग फुलांच्या पाकळ्या अंथरून सजवण्यात आला होता. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजी, जगदंबेच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article