अजित पवार गटाला गळती, कट्टर समर्थकाकडून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा

2 hours ago 1

Karmala Assembly Constituency 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण तरीही सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकांपूर्वीच अजित पवार गटाला गळती लागल्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. त्यातच आता अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.

करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी Exclusive संवाद साधला. यावेळी त्यांनी करमाळ्यातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल भाष्य केले. यावेळी संजयमामा शिंदे यांनी माझं श्रद्धास्थान शरद पवार साहेब आहेत, तर माझे नेते अजित पवार आहेत, असे वक्तव्य केले.

“राजकारणात टिकायचे असेल तर…”

“विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून कार्यकर्त्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकांबद्दलची चर्चा व्हावी. त्यामुळे अनेक आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यासोबत चर्चा झाली. यावेळी एकत्र चर्चा व्हावी, या दृष्टीने संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. जर राजकारणात टिकायचे असेल तर राजकारण हे जातीवरचं टिकणार नाही. पुण्याईवर टिकणार नाही. राजकारण टिकण्यासाठी विकासाचा दृष्टीकोन असेल तरच ते लाँगटर्म टिकेल. कारण लोक हे एका मुद्द्यावर राहत नाही. त्यांना प्रगती हवी असते. गेल्या ३० वर्षात तुम्ही काय केलं, यावर निवडणुकीत मतदान होते”, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हटले.

या संवाद मेळाव्याला आमदार बबनराव शिंदे आणि धनराज शिंदे असे शिंदे कुटुंब एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. याबद्दल संजयमामा शिंदेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तुम्ही आता राज्यातलं वातावरण बघताय, आता फक्त नवरा बायकोचा वाद लागायचा राहिला आहे. तो एकदा कुणाचं निघाला की विषय संपला. घरात आपण बघतोय की पिढ्या बदलल्या आहेत. विचारसरणी बदलली आहे. त्यामुळे घरातल्या घरात भांड्याला थोडं भांड लागतं, तो वाद चर्चेतून संपून जातो, असे संजयमामा शिंदे यांनी म्हटले.

“माझे श्रद्धास्थान शरद पवार”

“मी अपक्ष निवडणूक लढवणार हे माझ्या नेत्यानेच जाहीर केले. माझे श्रद्धास्थान हे शरद पवार साहेब आहेत, तर माझे नेते अजित पवार आहेत. मग भले मी कोणत्या पक्षात असो किंवा नसो, आमच्या दोघांची विश्वाससार्हता आहे ते एकमेकांना माहिती आहे. मी अपक्ष निवडणूक लढवणार असलो तरीही मी कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवणार याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, असेही संजय मामा शिंदे यांनी सांगितले

अजित पवारांनी करमाळयातील लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात बोलताना संजयला मत द्या असे म्हटले. पण त्यांनी कोणत्याही चिन्हाचा उल्लेख केला नाही. हे सगळं परवानगी घेऊन केलेलं आहे. त्यामुळे मी करमाळा विधानसभा मतदारसंघातून १०० टक्के अपक्ष निवडणूक लढवणार आहे”, असेही संजयमामा शिंदे म्हणाले.

संजय मामा शिंदे अजित पवारांचे कट्टर समर्थक

दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला गळती लागली आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी स्वत: न लढता मुलगा रणजितसिंह यांना लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुलगा रणजितसिंहच्या उमेदवारासाठी शरद पवारांना गळ घातली आहे. तर त्यांचे बंधू व करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे २०१९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवत जिंकले होते. सध्या ते अजित पवारांसोबत आहेत, पण सोमवारी तीन शिंदे बंधूंनी मेळावा घेतला, त्यात त्यांनी अपक्ष लढण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. संजय मामा शिंदे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. संजय मामा शिंदे यांच्या या निर्णयामुळे अजित पवारांना मोठा शह मिळणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article