3 ते 8% कुमारवयीनांना दारूमुळे गंभीर आजार:प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांनी साधला पत्रकारांशी संवाद
11 hours ago
1
‘आपल्याकडे साधारणत: मद्यप्राशन अर्थात दारु पिण्याचे सरासरी वय १८ वर्षाचे होते. परंतु आज काळानुरुप बदललेली परिस्थिती पाहता ते १२ ते १५ वर्षांवर आले आहे. कुमारावस्थेतील मुलेही दारुच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत. कमी अर्थात कुमारवयात वयात दारु पिण्याचे जडलेले हे व्यसन पाहता त्यापासून मानवास जडणाऱ्या व्याधींचा धोकाही वाढला आहे. आजच्या स्थितीत १०० पैकी ३ ते ८ टक्के लोकांना कमी वयात दारू पिण्यामुळे गंभीर आजार जडत आहेत, अशी माहिती अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (ए.ए.) संस्थेचे माजी विश्वस्त तथा मुंबई येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांनी येथे दिली. अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (ए.ए.) म्हणजेच अनामिक मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करणारी संस्था आहे. या संस्थेच्या अकोला फेलोशिप समूहाचा वर्धापन दिन सोहळा ‘अल्काथॉन’ रविवारी येथील नेहरु चौकातील जीवन प्राधिकरणाच्या जीवन तरंग हॉल येथे झाला. या कार्यक्रमात संस्थेच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. आशिष देशपांडे येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. मानसोपचार तज्ञ डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, दारु पिण्याचे जडलेले व्यसन मानवी आयुष्याची राखरांगोळी करते,हे समाजाने जाणून घेतले पाहिजे. दारु सेवनामुळे २०० प्रकारचे वेगवेगळे आजार ज़डतात. आज एक तृतीयांश आत्महत्या या दारुच्या प्रभावामुळे तर दोन तृतीयांश आत्महत्या या कौटुंबिक हिंसाचार वादातून घडतात. ४० टक्के लोकांच्या नोकऱ्या या दारुच्या व्यसनांमुळे नोकरीच्या ठिकाणी गैरहजर राहण्यामुळे गेल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (ए.ए.) संस्थेतर्फे मद्यपींची दारु सुटावी, यासाठी प्रबोधन व्हावे या उद्देशाने जनजागृतीसभा, अल्केथॉन उपक्रमांतर्गत दारु सोडलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचे स्वानुभव कथन केले जातात. त्यातून दारुचे व्यसन जडलेल्या व्यक्तींना दारु सोडण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळते, असेही डॉ. देशपांडे म्हणाले. यावेळी संस्थेच्या अकोला शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. अल्कोहोलिक्स अॅनॉनिमसच्या (ए.ए.) अकोला जिल्हा शाखेच्या आकडेवारीनुसार संस्था स्थापनेपासून गेल्या १३ वर्षांत ४० जणांनी दारु सोडली. गेल्या एका तपापासून ते व्यसनमुक्त आणि तंदुरुस्त जीवन जगत आहेत. यातील काही तर मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. काहींचे दारुच्या व्यसनांमुळे विस्कटलेले संसार पुन्हा सुरळीत सुरू झाले. हे सर्वजण आणि त्यांच्या सौभाग्यवती या स्वेच्छेने अल्कोहोलिक्स अॅनॉनिमसच्या कार्यात अजूनही सक्रीय आहेत, असेही डॉ. देशपांडे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)