Assembly Election 2024 – रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात, पोलीस यंत्रना सज्ज

2 days ago 2

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात 1 हजार 747 मतदान केंद्रांवर 13 लाख 23 हजार 413 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 6 लाख 39 हजार 016 पुरुष आणि 6 लाख 84 हजार 387 महिला मतदार आहेत. इतर 10 मतदार आहेत. मतपेट्या घेऊन कर्मचारी वर्ग आजच मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान प्रक्रियेत 7 हजार 776 कर्मचाऱ्यांचा सहभाग असून 2 हजार 404 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये दापोली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांची मिंधे गटाचे उमेदवार योगेश कदम यांच्याशी लढत आहे. दापोलीमध्ये 392 मतदान केंद्रांवर 2 लाख 85 हजार 293 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 37 हजार पुरुष आणि 1 लाख 48 हजार 252 महिला मतदार आहेत. गुहागर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे आमदार भास्कर जाधव यांची लढत मिंधे गटाच्या राजेश बेंडल यांच्यासोबत आहे. गुहागर विधानसभा मतदार संघात 322 मतदान केंद्रांवर 2 लाख 41 हजार 010 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 14 हजार 843 पुरुष आणि 1 लाख 26 हजार 167 महिला मतदार आहेत.

चिपळूण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव विरुध्द अजित पवार गटाचे शेखर निकम अशी लढत आहे. चिपळूणमध्ये 336 मतदान केंद्रांवर 2 लाख 72 हजार 831 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 33 हजार 441 पुरुष आणि 1 लाख 39 हजार 390 महिला मतदार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे बाळ माने विरुध्द मिंधे गटाचे उदय सामंत यांच्यात लढत रंगणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 352 मतदान केंद्रांवर 2 लाख 88 हजार 218 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 40 लाख 898 पुरुष, 1 लाख 47 हजार 310 महिला आणि 10 इतर मतदार आहेत. राजापूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे आमदार राजन साळवी यांच्याविरुध्द मिंधे गटाचे किरण सामंत निवडणूक लढवत आहेत. राजापूरमध्ये 345 मतदान केंद्रांवर 2 लाख 36 हजार 061 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 12 हजार 793 पुरुष आणि 1 लाख 23 हजार 268 महिला मतदार आहेत.

उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. ते म्हणाले की, मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 404 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असतील. त्याचबरोबर 1 हजार 600 होमगार्ड, केंद्रीय राखीव दलाच्या 4 तुकड्या, राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या यांच्यासह बंदोबस्तावर देखरेख ठेवण्यासाठी 123 पोलीस अधिकारी तैनात असतील. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून गस्त घालण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील 6 चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. सायबर टीम सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे. सीसीटिव्ही व्हॅनमधून सर्वत्र चित्रीकरण करुन लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन ड्रोन कॅमेऱ्यांची गर्दीवर नजर असेल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article