पर्थ : वृत्तसंस्था ; क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ आजपासून एका मोठ्या लढाईसाठी आमने-सामने येणार आहेत. भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून, तिथे त्यांना बॉर्डर-गावसकर ट्रॉफीअंतर्गत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (22 नोव्हेंबर) पासून पर्थ येथे होणार आहे. मालिकेच्या इतिहासात आकडेवारी भारतीय संघाच्या बाजूने असली, तरी यंदाच्या मालिकेत भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. विशेषत:, मालिकेतील पहिला सामना भारतीय संघासाठी सोपा असणार नाही. कारण, टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी शिवाय मैदानात उतरणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताचे नेतृत्व करणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे असेल. (Border-Gavaskar Trophy)
पहिल्या दोन्ही कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ खेळला असून, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तिसर्या प्रयत्नात तरी विजेतेपद पटकावायचे या निर्धाराने रोहित सेना गेले दोन वर्षे प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यशही येत होते. परंतु, महिन्यापूर्वी न्यूझीलंड संघ भारतात आला आणि सगळे चित्र बदलले. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला भारतात 3-0 असा ‘व्हाईट वॉश’ दिला. या अनपेक्षित धक्क्याने भारताचे सांख्यितिक नुकसान तर झालेच, परंतु मानसिक खच्चीकरणही झाले. भारताच्या फिरकी खेळपट्टीवर भारतालाच गिरकी घ्यायला लागणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला आता ऑस्ट्रेलिया 5 पैकी 4 कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. त्याचा दबाव भारतीय संघावर असणार आहे. त्यातच रोहित शर्मा, शुभमन गिल, मोहम्मद शमी हे संघात नसल्याने द्वितीय पसंतीच्या खेळाडूंवर बुमराहला ‘डाव’ खेळावा लागणार आहे. अशा स्थितीत पर्थवर नितीशकुमार रेड्डी या नवख्या अष्टपैलू खेळाडूचे कसोटी पदार्पण जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघातून सलामीवीर नॅथन मॅकस्विनी याला संधी मिळण्याची शक्यता आहे. यजमान संघ तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज संघात खेळवण्याची शक्यता आहे. मिचेल मार्श हा पार्टटाईम फिरकी खेळाडू गोलंदाजी करू शकतो.
Border-Gavaskar Trophy :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), सर्फराज खान, ध्रुव ज्युरेल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, लेक्स कॅरी (यष्टिरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
स्थळ : वॅका स्टेडिअम, पर्थ
सामन्याची वेळ : स. 7.50 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्
लाईव्ह स्ट्रिमिंग : जिओ सिनेमा
मालिकेचे वेळापत्रक (Border-Gavaskar Trophy)
पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ क्रिकेट स्टेडियम, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ओव्हल, अॅडलेड
तिसरी कसोटी : 14 - 18 डिसेंबर, गाबा स्टेडियम, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी (2025), सिडनी ग्राऊंड, सिडनी