सातशे किलो गोमांस जप्तFile Photo
Published on
:
04 Dec 2024, 7:49 am
शिर्डी शहरात विक्रीसाठी आणलेले 1. 40 लाख रुपयांचे 700 किलो गोमांसासह दोन मोटारसायकल व मोबाईल असा सुमारे 2.60 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवार (दि. 3) रोजी सकाळी 9ः30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शिर्डीतील कालिकानगर, बाजार तळ येथील जुन्या मटन मार्केटमध्ये गजबजलेल्या नागरी वस्तीमध्ये खुलेआम गोवंशाचे गोमांस विक्रीचे दुकान मांडून काही लोक बसले आहेत, अशी माहिती बजरंग दल गोरक्षक दलाचे राहाता प्रखंड यांना समजली. कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. गोवंशाची कत्तल करून विक्रीसाठी आणलेले 700 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील मेहबूब शेरखान कुरेशी (45, रा. कोपरगाव) सादिक लालू कुरेशी (45, रा. ममदापूर, ता. राहाता, समीर आरिफ कुरेशी (21 रा. कोपरगाव), सोहेल आयोग कुरेशी (27, रा. कोपरगाव) व मुस्ताक रफिक कुरेशी (20, रा. ममदापूर) आरोपी बंदी असतानासुद्धा संगणमत करून गोवंश जनावरांची कत्तल केलेल्या गोमांसाची विक्री करताना रंगेहात पकण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद सूर्यवंशी यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप निरीक्षक ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल राजपूत, पोलिस काँन्स्टेबल जराड, सूर्यवंशी, झरेकर यांनी ही कारवाई यशस्वी केली. कालिका नगर परिसरात सकाळी केलेल्या या कारवाईमुळे बघ्यांची मोठी गर्दी दाटली होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहे.
शिर्डी पोलिसांना का माहिती मिळत नाही?
शिर्डीमध्ये गोमांसाची सर्रास विक्री होत आहे, हे वास्तव कारवाईनंतर उघड झाले आहे. याबाबत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांना माहिती मिळते, मात्र पोलिसांना तत्पूर्वी का माहित होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोमांस विक्रीला नेमकं कोण साथ देते, याचा शोध घेणे गरजेचे आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया येथील जागरुक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.