Published on
:
20 Nov 2024, 12:17 pm
Updated on
:
20 Nov 2024, 12:17 pm
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची (Delhi Air Pollution) पातळी गंभीर आहे. त्यामुळे दिल्ली सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारचे ५० टक्के कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करणार आहेत. त्यासाठी बुधवारी दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय (Delhi Environment Minister Gopal Rai) यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
गोपाल राय यांनी X वर पोस्ट करुन सांगितले की, आज दिल्ली सचिवालयात पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये दिल्ली सरकारचे ५० टक्के कर्मचारी घरून काम करतील, असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, खाजगी कार्यालयांसाठीही घरून काम करण्याच्या सूचना जारी केल्या जात आहेत आणि अत्यावश्यक सेवांची कार्यालये पूर्ण कर्मचाऱ्यांसहित सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीत कृत्रिम पावसाची गरज
संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील प्रदूषणाची परिस्थिती पाहता, धुके कमी करण्यासाठी दिल्ली सरकार (दिल्लीमध्ये) अनेक पर्यावरणवादी आणि तज्ज्ञांशी सतत संवाद साधत असल्याच गोपाल राय यांनी सांगितले. मी आज चौथ्यांदा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मंजूरी देण्याची विनंती केली आहे. तसेच कृत्रिम पावसासाठी आयआयटी कानपूरच्या तज्ञांसोबत एक तात्काळ बैठक घेण्याची विनंती केली.
शाळा ऑनलाईन सुरु, नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन
दरम्यान, दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी याअगोदर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथा टप्पा (ग्रॅप ४) लागू करण्यात आला आहे. शाळा ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या ६० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना जास्तीत जास्त वेळ घरातच राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे.