महायुतीचे शिंदखेड्याचे आ. जयकुमार रावळ व शिरपूरचे आ. काशीराम पवार हे चौथ्या वेळेस, तर साक्रीच्या आ. मंजुळा गावित यांनी सलग दुसरा विजय साकारला. Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 9:29 am
Updated on
:
24 Nov 2024, 9:29 am
राज्याप्रमाणेच धुळे जिल्ह्यात महायुतीने मुसंडी मारत विरोधकांना हद्दपार केले. त्यातही भाजपने आपल्या दोन जागा राखतानाच अजून दोन मतदारसंघ ताब्यात घेतले. महायुतीचे शिंदखेड्याचे आ. जयकुमार रावळ व शिरपूरचे आ. काशीराम पवार हे चौथ्या वेळेस, तर साक्रीच्या आ. मंजुळा गावित यांनी सलग दुसरा विजय साकारला. धुळे ग्रामीणमधून राम भदाणे (राघवेंद्र पाटील) आणि धुळे शहरमधून अनुप अग्रवाल हे भाजपच्या तिकिटावर दणदणीत मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीचे आमदार कुणाल पाटील आणि 'एमआयएम'चे आमदार फारुक शाह यांना पराभवाचा धक्का बसला. जिल्हावासीयांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत अत्यंत चुरशीच्या लढती पार पडल्या. गत पंचवार्षिकला धुळे जिल्ह्यातील पाचपैकी दोन मतदारसंघ भाजपकडे तर, काॅंग्रेस, एमआयएम आणि अपक्षाला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले होते. हे चित्र पालटत आता महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे.
आजी-माजी आमदारांना अग्रवालांचा धोबीपछाड
धुळे शहर मतदारसंघात भाजपचे अनुप अग्रवाल यांची सलग तीन वेळेस आमदार असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे आणि दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेले 'एमआयएम'चे फारुक शाह यांच्याबरोबर लढत झाली. या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा कमालीचा यशस्वी झाला. अग्रवाल यांना तब्बल एक लाख १५ हजार १२५ मते घेत फारुक शाह यांचा ४४ हजार ८३६ मतांनी पराभव केला. शाह यांना ७० हजार २८९ आणि गोटे यांना २३ हजार ४९६ मतांवर समाधानी राहावे लागले.
कुणाल पाटील यांची हॅट्ट्रिक हुकली
धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपचे राघवेंद्र (राम) पाटील - भदाणे यांनी दणक्यात विजयश्री खेचत कॉंग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांची हॅट्ट्रिकची संधी हुकवली. त्यांचा तब्बल ५६ हजार ९३४ मतांनी पराभव झाला. या जागेवरील पराजयाने कॉंग्रेसची धुळे जिल्ह्यातील अखेरची संधीही संपुष्टात आली. पाटील-भदाणे यांना एक लाख ४१ हजार ६१८ मते मिळाली. कुणाल पाटील यांना ८४ हजार ६८४ मतांवर समाधान मानावे लागले. भदाणे यांच्या मातोश्री माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे या गतवेळी १४ हजार मतांनी पराभूत झाल्या होत्या.
शिंदखेड्यात भाजपचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संदीप बेडसे यांचा तब्बल ९५ हजार ८८४ मतांनी पराभव केला. त्यांनी सलग चौथ्यांदा विधानसभा गाठली आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते पर्यटनमंत्री होते.
आमदार पावरांचा करिश्मा कायम
शिरपूर मतदारसंघातून चौथ्यांदा रिंगणात असलेल्या भाजपचे आमदार काशीराम पावरा यांच्यासमोर अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी आव्हान उभे केले होते. ठाकूर हे तिसऱ्यांदा नशीब आजमावत होते. या मतदारसंघांमध्ये विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आ. पावरा हे पहिल्यांदा आमदार होऊन भाजपत दाखल झाले होते. यावेळीदेखील त्यांच्यावरच महायुतीने विश्वास टाकला हाेता. तो त्यांनी सार्थ ठरवला. त्यांनी एक लाख ७८ हजार ७३ मते घेत ठाकूर यांचा एक लाख ४५ हजार ९४४ मतांनी पराभव केला. त्यांना ३२ हजार १२९ मते मिळाली.
बाराव्या फेरीनंतर आ. मंजुळा गावितांची खेचला विजयश्री
साक्री मतदारसंघातून गतवेळी अपक्ष विजय साकारत शिवसेनेत दाखल झालेल्या मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून यंदा निवडणूक लढवली. काँग्रेसने माजी खासदार बापू चौरे यांचे पुत्र प्रवीण चौरे यांना उमेदवारी दिली होती. भाजपतून नाराज असणारे मोहन सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली. गावित या बाराव्या फेरीपर्यंत मागे पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी आघाडी घेत 5584 मतांनी विजय साकारला. गावित यांनी एक लाख 4 हजार 649 मते मिळवली. तर चौरे यांना 99 हजार 65 मते मिळाली. अपक्ष सूर्यवंशी यांना १४ हजार २८८ मतांवर समाधान मानावे लागले.
एकूणच धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिरपूर आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीचा धुवा उडवला. तर साक्री विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या तथा शिवसेनेच्या आ. मंजुळा गावित यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारली आहे.